संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि प्राज आस्थापनाचे कर्मचारी यांनाही बाहेर काढले
चिंचवड : थेरगाव घाटावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गौरीविसर्जनाच्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्टला नेहमीप्रमाणे प्रबोधन मोहीम राबवण्यात येत होती. दुपारी पोलिसांनी येऊन मात्र समितीच्या कार्यकर्त्यांना ती मोहीम बंद करण्यास भाग पाडले. तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचेच असेल, तर केवळ फलक ठेवा; मात्र कुणीही व्यक्तीने त्या ठिकाणी थांबायचे नाही. अन्यथा तुम्हाला कलम १४९ ची नोटीस बजावू, असे सांगत पोलिसांनी विसर्जन घाटांवरील समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना निघून जाण्यास सांगितले. ‘समितीच्या वतीने या मोहिमेविषयी पोलिसांना पूर्वसूचना दिली होती, तसेच ही मोहीम प्रबोधनात्मक असून एकप्रकारे धर्मसेवाच आहे’, असे सांगण्याचा समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांची बाजू ऐकून न घेता त्यांना मोहीम बंद करण्यास सांगितले. त्याच वेळी मूर्तीदान आणि निर्माल्यदान ही मोहीम राबवणार्या संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि प्राज आस्थापनाचे कर्मचारी यांनाही पोलिसांनी मोहीम बंद करण्यास सांगितले.
पिंपरी-चिंचवडचे साहाय्यक पोलीस आयुक्त यांनी अन्य पोलीस अधिकार्यांना कार्यकर्त्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहून घेण्याचे तोंडी आदेश दिले. (सुक्याबरोबर ओलेही जाळण्याचा पोलिसी बाणा ! वास्तविक संस्कार प्रतिष्ठानची मोहीम भाविकांची दिशाभूल करणारी, तर समितीची मोहीम धर्मसुसंगत होती. सनदशीर मार्गाने मोहीम राबवण्याचा कायद्याने अधिकारही दिलेला आहे. असे असतांना पोलिसांनी चुकीच्या गोष्टी बंद करून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवे होते; मात्र सरसकट समितीची प्रबोधनात्मक आणि सनदशीर मार्गाने चालणारी मोहीमही बंद करणे हे अयोग्य आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पोलिसांनी मोहीम राबवणार्या सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले असले, तरी कमिन्स आस्थापनाचे कर्मचारी, तसेच जैन विद्यालयाचे विद्यार्थी भाविकांना निर्माल्य दान करण्याचे आवाहन करतच होते. काही भाविकही कृत्रिम हौदातील पाण्यात मूर्ती बुडवून त्याचे दान देत होते. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळे होणारी अयोग्य कृती ! धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विधिवत् विसर्जन केले, तर त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात