मुसलमान समाजाशी चर्चा करून मशिदींवरील भोंग्यांविषयी निर्णय होणार
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मशिदीवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे काढण्यात यावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने ३१ ऑगस्टला पहाटे ५ वाजता बिंदू चौक येथे कमांडो फ्रेंड सर्कल मंडळाच्या गणपतीची आरती केल्यानंतर मुसलमानांना गुलाबपुष्प देऊन भोंगे काढण्याचे आवाहन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार आणि श्री. विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हेे आंदोलन करण्यात आले. या वेळी मुस्लिम बोर्डींगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आम्ही चर्चा करून भोंग्याविषयी निर्णय घेतो, असे सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. दुर्गेश लिंग्रस, कार्यकर्ते श्री. विराज ओतारी, श्री. कमलाकर जगदाळे, उपशहरप्रमुख श्री. सुजित चव्हाण, श्री. शशी बिडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, हिंदुत्वनिष्ठ श्री. भगवान कदम, शिवसैनिक श्री. दत्ता टिपुगडे, श्री. अवधूत साळोखे, श्री. दिलीप देसाई, श्री. साताप्पा शिंदे, मुसलमान समाजाचे महंमद बागवान आणि खुदबुद्दीन देसाई उपस्थित होते.
१. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००२ मध्ये मशिदीवरील भोंगे विनापरवाना काढण्यात यावेत, असा आदेश दिला आहे; मात्र अजूनही या आदेशाचे पालन केले जात नाही. मशिदीवरील हे भोंगे काढण्यासाठी शिवसैनिक बिंदू चौकात आले.
२. पहाटे ५ वाजता कमांडो फ्रेंड सर्कल मंडळातील श्री गणेशाची आरती केल्यानंतर शिवसैनिक बागवान मशिदीकडे जात असतांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले.
३. मुसलमानांना बिंदू चौकात बोलवतो, असे त्यांनी सांगितले. यानंतर कादर मलबारी, गणी आजरेकर, मुबारक शेख हे चर्चेला आले. या वेळी चर्चा करतांना श्री. संजय पवार यांनी मुसलमानांना गुलाबपुष्पे देऊन चर्चा केली.
मशिदींवरील भोंगे काढण्याविषयी पोलिसांनी अगोदरच बैठक का घेतली नाही ? – संजय पवार, शिवसेना
श्री. संजय पवार मुसलमान बांधवांशी चर्चा करायला आल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत म्हणाले, तुम्ही मशिदीत भेटायला जाऊ नका. मी मुसलमान बांधवांबरोबर बैठक घेतो. बैठकीत भोंग्याचा उद्देश सांगतो. याला उत्तर देतांना श्री. संजय पवार म्हणाले, तुम्ही हे आधी करायला हवे होते. आम्ही सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात हे सूत्र येणार आणि बैठक घेणार. मी मुसलमानांशी वाद घालणार नाही, तर भेटून चर्चा करणार आहे.
डॉल्बीविषयी बोलण्याऐवजी मशिदींवरील भोंग्याविषयी बोला ! – संजय पवार
श्री. संजय पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची गणेशोत्सवात अंमलबजावणी (कार्यवाही) करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून हिंदूंचे सण साजरे करण्याला बंधने आणली जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००२ मध्ये दिलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून मशिदींवरील भोंगे काढावेत. हिंदु-मुसलमान गुण्यागोंविदाने येथे रहात आहेत; मात्र मशिदींवरील भोंग्यामुळे सर्वांना त्रास होतो. पूर्वी सुविधा नव्हत्या; मात्र आता सर्व सुविधा मिळत असल्याने मशिदींवरील भोंग्यांची आवश्यकता नाही. या भोंग्यामुळे लोकांना त्रास होतो.
या वेळी गणी आजरेकर म्हणाले, कोणत्याही धर्माचे सण साजरे करण्याला आमचा विरोध नाही. तुम्ही डॉल्बीविषयी जी भूमिका घेतली, त्याला माझा पाठिंबा आहे. यावर श्री. संजय पवार म्हणाले, मी डॉल्बीविषयी बोलायला आलो नाही. मशिदींवरील भोंग्यांविषयी मी चर्चा करत आहे, हे तुमच्या लक्षात आले आहे का ? तेव्हा गणी आजरेकर म्हणाले, तुमचे सूत्र माझ्या लक्षात आले आहे. मशिदींवरील भोंग्याविषयी मुसलमान समाजातील लोकांशी मी चर्चा करतो. चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याची आमची सिद्धता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात