मुंबई : बाबा राम रहीम यांच्या नावातच राम, रहीम आणि इन्सान आहे. त्यामुळे ते पुरोगामी वाटतात. स्वातंत्र्यानंतर हिंदु समाजाला नैतिकता आणि धर्मशिक्षण मिळालेले नाही. आजही स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर तळागाळातील नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नसल्यानेच ते भोंदूबाबांकडे जातात. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर भोंदूबाबांची पैदास रोखण्यासाठी धर्मसंस्था अपयशी आहे ? या विषयावर २८ ऑगस्टला आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.
डॉ. शेवडे पुढे म्हणाले की,
१. कलियुगात गुरु करायला हवा, असे कोठेही म्हटलेले नाही. उलट योग्य वेळ आली की, गुरु आपणहून तुमच्या आयुष्यात येतात.
२. दांभिक, भोंदूबाबा आणि खरे संत कोण, हे सांगितल्यावर त्यावर विश्वास कोण ठेवणार, ही अडचण आहे.
३. राजसत्तेला व्होट बँक हवी; म्हणून त्यांची भोंदूगिरी करणार्या बाबांशी युती आहे.
भोंदूबाबांना ओळखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती
भोंदूबाबांना ओळखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. ते न मिळाल्याने सर्वसामान्य हिंदू फसला जात आहे. यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सक्रीयपणे कार्य करत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते विजय पांढरे आणि निवृत्त सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी हेही चर्चेत सहभागी होते.
श्री. सुनील घनवट यांनी मांडलेली सूत्रे
१. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी भोंदूबाबांना रोखण्यासाठी नाशिक आणि उज्जैन येथील कुंभमेळ्यांत प्रबोधन केले होते, तसेच त्या वेळी सर्व साधूसंतांना एकत्र करून संमेलनही घेतले होते. याचसमवेत एका पत्रकार परिषदेद्वारे समाजाला संस्थेच्या या कार्याविषयी अवगत केले होते.
२. आतापर्यंतच्या सर्व संतांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यासाठी कार्य केले आहे. त्यामुळे तथाकथित पुरोगामी आणि नास्तिकतावाद्यांनी साधूसंतांचे अंधश्रद्धाविषयक कार्य आणि भोंदूगिरी यांविषयी बोलण्याची आवश्यकता नाही.
३. बाबा राम रहीम यांसारख्या भोंदूबाबांमुळे हिंदु धर्म कलंकित होतो.
४. विजय पांढरे यांच्यासारखे लोक सरसकट सर्व साधूसंतांवर आरोप करतांना जे खरे साधूसंत आहेत, त्यांच्यावरही आरोप करतात, ते अत्यंत चुकीचे आहे.
(म्हणे) धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे सध्या साटेलोटे झाले आहेत ! – विजय पांढरे
संत ज्ञानेश्वरांच्या २ ओव्यांचा संदर्भ देत विजय पांढरे यांनी सांगितले की, गेल्या १ सहस्र वर्षांत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी खरी अंधश्रद्धा रोखण्याचे कार्य केले आहे. सध्याचा काळात श्रद्धेचा बाजार मांडला गेला आहे. खरे अध्यात्म लोप पावले आहे. त्यामुळे राजसत्तेने धर्मसत्तेला खतपाणी घातले असून त्यांचे सध्या साटेलोटे झाले आहेत. (तोंड आहे म्हणून बोलणारे पांढरे ! भारतात जर धर्मसत्ता अस्तित्वात असती, तर देश रसातळाला गेलाच नसता. देश हा धर्मनिरपेक्षतावादी आहे, म्हणूनच ही परिस्थिती उद्भवली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आजचे बाबा चंगळवाद आणि भोंगळवाद शिकवतात.
सर्वच धर्मांमध्ये भोंदूबाबा आहेत ! – अविनाश धर्माधिकारी
भोंदूबाबा हे केवळ हिंदु धर्मच नाही, तर सर्वच धर्मांमध्ये आहेत. त्यामुळे सर्वच दृष्टीने या समस्येवर विचार करायला हवा. नागरिकांच्या श्रद्धांचा अपलाभ घेण्याचे काम ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मातही केले जाते. ख्रिश्चनांचे फादर यांनी चर्चमध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण केले असून ते व्हॅटिकनद्वारे दडपलेही गेले आहे. श्रीकृष्ण, बुद्ध यांच्यापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत सर्वांनी मी शास्त्र सांगतो, ते करून पहा, असेच सांगितले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात