Menu Close

गणेशमूर्तीची विल्हेवाट न लावता तिचे विसर्जन होणे आवश्यक ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

साम वृत्तवाहिनीचे बाप्पाला निरोप देतांना डोकं वापरायचे कि नाही ? या विषयावरील चर्चासत्र

मुंबई : कोणताही सण श्रद्धेचा आहे. त्यामुळे कोणत्याही कृतीची बळजोरी करायला नको. गणपतीची मूर्ती जर घरी बादलीत विसर्जित होऊ शकते, तर ती नदीतही विसर्जित होणार. केवळ मूर्तीमुळेच नदीचे प्रदूषण होत नाही. श्री गणेशाची मूर्तीविसर्जन करण्यासाठी रासायनिक द्रव्य घालून तिची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे गणेशमूर्तीची विल्हेवाट न लावता तिचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि आम्हाला आमच्या पद्धतीने विसर्जन करू द्यावे. हिंदूंच्या होळी, दहीहंडी उत्सव आणि अन्य प्रत्येक सणाला विरोध करणे योग्य नाही, असे सडेतोड प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी केले. साम वृत्तवाहिनीने बाप्पाला निरोप देतांना डोकं वापरायचे कि नाही ? या विषयावर २७ ऑगस्टला चर्चासत्र आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या चर्चासत्रामध्ये पर्यावरणप्रेमी नितीन शुक्ल, स्वदेशी भांडारचे मनीष मारू, अंनिसच्या नंदिनी जाधव, पर्यावरणप्रेमी पत्रकार किरण जोशी आणि सूत्रसंचालक जयराम पुरी सहभागी झाले होते.

तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगाम्यांना चपराक देणारी श्री. दवे यांची सूत्रे…

श्री. आनंद दवे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

१. आज रस्त्यावर उतरतांना आत्महत्या केल्यासारखी प्रदूषणाची स्थिती आहे. कारण हवा, पाणी आणि अन्य विविध प्रदूषणांमध्ये धोक्याच्या पातळीपेक्षा वाढ झाली आहे.

२. गणेशमूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांना मूर्ती बनवण्याची उंची, ती शाडू मातीची बनवणे अशी बंधने घातल्यास चांगले होईल.

३. कृत्रिम हौदामध्ये विसर्जन वा घरी बादलीत विसर्जन करतांना जे रासायनिक द्रव्य घातले जाते, त्यामुळे हातावर रॅश उठतात आणि तेच पाणी झाडाला घातल्यास झाडेही दगावू शकतात. त्या रासायनिक द्रव्यामुळेही प्रदूषण होणारच.

४. बहुसंख्य हिंदूंना जे वाटते, ते करू द्यावे. एखादा हिंदु वहात्या पाण्यात विसर्जन करत असतांना तेथे मुद्दामहून थांबून विरोध करण्याची आवश्यकता नाही. श्री गणेशमूर्तीचे विसर्जन ही परंपरा असून तिला विरोध करायला नको. असे करणे हे खाजवून खरुज काढण्यासारखे आहे. हिंदु धर्म सहिष्णू असून आम्ही नवीन परंपरा स्वीकारतो.

५. विरोध करणारे केवळ हिंदूंच्या सण अन् उत्सव यांच्या वेळीच विरोध करतात. बकरी ईदच्या वेळी विरोध करणारे केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बकर्‍या सिद्ध करून त्या कापा, असे आवाहन ते का करत नाहीत. कारण प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्‍न आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून जिप्सम नावाचा घटक सिद्ध होऊन त्यापासून जलशुद्धी होते. त्यासाठी नदीच्या पाण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.

६. विदेशातही मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे सर्व सण-उत्सव साजरे करतात. तेथे त्यांना कोणी शहाणपणा शिकवत नाही आणि शिकवले, तर त्याला बाजूला काढले जाते.

(म्हणे) आम्ही कोणाच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेला तडा जाऊ देत नाही ! – नंदिनी जाधव

नदीमध्ये लक्षावधी गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातात. त्यामुळे वर्ष २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कृत्रिम हौदाचा कायदा केला. (दिशाभूल करणारे अंनिसवाले ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अंनिसच्या ३१० शाखांमधून विद्यार्थ्यांच्या साहाय्याने वर्ष २०१० पर्यंत मूर्तीदान मोहीम राबवली होती. त्यातूनच जनजागृती होऊन कृत्रिम हौद बांधण्याची संकल्पना पुढे समाजाने उचलून धरली. (अनेक ठिकाणी समाज हा उपक्रम नाकारत आहे, हेही तितकेच सत्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) जलप्रदूषणाविषयी उत्सवाच्या आधीपासूनच प्रबोधन करायला हवे. गणेशमूर्तींमुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होतात. त्यामुळे पुढच्या पिढीचा विचार करून त्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी. काही संघटना या नदीकाठी उभे राहून वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे प्रबोधन करतात. पुढच्या पिढीचा विचार करून आणि प्रदूषण टाळण्यासाठीच होळीला झाडे तोडण्याऐवजी अंनिस होळी लहान, पोळी दान ही मोहीम राबवते. यामध्ये आम्ही कोणाच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेला तडा जाऊ देत नाही. (असे आहे तर अंनिसवाले बकरी ईदच्या वेळी असे आवाहन करतांना वा एखाद्या पशूवधगृहासमोर आंदोलन करतांना दिसत का नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

गोमय गणपतीचा वापर करायला हवा ! – मनीष मारू

गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन केल्यावर त्या पुन्हा वर येतात आणि त्यांचे विडंबन होते; परंतु तसे विसर्जन केल्याने पाण्यातील जीवजंतू मरतात. त्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला ? (असे आहे तर लक्षावधी लिटर सांडपाणी आणि रसायनमिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे जलचर मरत नाहीत का ? याविषयी मनीष मारू बोलतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यावर पर्याय म्हणून गोमय गणपति बसवू शकतो. गोमय गणपती घरच्या घरी विसर्जित करून त्याचे पाणी खत म्हणून झाडांना वापरू शकतो. (श्री गणेशाचे तत्त्व शाडूच्या मातीमध्ये आकर्षित करण्याची क्षमता सर्वाधिक आहे. त्यामुळे ती मूर्ती बसवणे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या पूरक आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या वेळी नितीन शुक्ल आणि किरण जोशी यांनीही नदीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम हौदामध्ये वा घरच्या घरी बादलीमध्ये विसर्जन करण्याविषयीची भूमिका मांडली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *