गणेशमूर्तींची विटंबना होत असल्याने कृत्रिम हौद आणि मूर्तीदान संकल्पनेला विरोध
चिंचवड : गणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जन घाटांवर काही संस्था पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे सांगत गणेशमूर्तींचे दान घेतात. कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या अथवा दान दिलेल्या गणेशमूर्ती कचर्याच्या गाडीतून नेऊन अस्वच्छ ठिकाणी फेकण्यात येतात. कृत्रिम हौद आणि मूर्तीदान हा हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारा निर्णय असून जनतेच्या पैशांचा चुराडा आहे. हिंदूंच्या देवतांची विटंबना कदापि सहन केली जाणार नाही. वेळप्रसंगी देवतांची विटंबना रोखण्यासाठी रस्त्यावर उतरू, अशी चेतावणी शहरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. बजरंग दलाचे सर्वश्री संदेश भेगडे, दिनेश लवंगे, कुणाल साठे, सागर चव्हाण, संजय शेळके, अभिजीत शिंदे, नाना सावंत यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत. सर्वश्री माऊली तावरे, प्रथमेश घार्गे, आकाश कुल्हाने, अनिकेत पन्हाळे, रोहित माने, उत्कर्ष सोरटे यांनी या संदर्भात वाकड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी माने यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,
१. सांडपाणी, कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाणी यांच्या तुलनेत श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण नगण्य असल्याचा सृष्टी इको लॅबचा अहवाल आहे.
२. अनंत चतुर्दशीला, तसेच गणेश विसर्जनाच्या अन्य दिवशी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नद्यांना पुरेसे पाणी सोडण्यात यावे जेणेकरून मूर्ती व्यवस्थित विसर्जित होतील.
३. आवश्यकता भासल्यास जलाशयामध्ये अथवा तळ्यामध्ये एका कोपर्याला लोखंडी तारेच्या जाळीने बांधलेली पोकळ दगडी भिंत सिद्ध करून गणेशभक्तांना तेथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास सांगावे.
४. मूर्तीदान घेणार्यांकडून मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न झाल्यास संबंधितांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात