आमदार राजेश क्षीरसागर यांचे लाक्षणिक उपोषण !
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मुंबई शहरामध्ये गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती द्यावी, यासाठी ३ सप्टेंबरला येथील छत्रपती शिवाजी चौक येथे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.
सांगली, सातारा, कराड, मिरज आदी शहरांमध्येही पोलीस प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेऊन मंडळांना ध्वनीक्षेपक यंत्रणा लावण्यास अनमुती दिली असतांना येथील गणेशोत्सव मंडळावर आणि ध्वनीयंत्रणा व्यावसायिकांवर दंडुकशाहीचा वापर करून अनुमती नाकारण्यात येत आहे. प्रशासनाची ही भूमिका अयोग्य असून दोन ध्वनीयंत्रणा (डॉल्बीचे थर) लावण्याला जिल्हा प्रशासनाने अनुमती द्यावी, अशी मागणी श्री. राजेश क्षीरसागर यांनी केली.
या वेळी लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, शहरातील तालीम संस्था आणि मंडळ यांचे पदाधिकारी, ध्वनीयंत्रणेचे व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपोषणाला विविध तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळे, ३७ तालीम संस्था, २६५ संघटना आणि मंडळे तसेच संस्था यांनी पाठिंबा दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात