विज्ञानाचे आव्हान धर्माला नव्हे, तर विज्ञानालाच !
५ सप्टेंबर या दिवशी असणार्या स्वामी वरदानंद भारती यांच्या जयंतीच्या निमित्ताने..
कोणीतरी कुठेतरी म्हणतो की, विज्ञानाचे धर्माला आव्हान निर्माण झाले आहे. वास्तविक विज्ञानाचे धर्माला कधीच आव्हान असण्याची शक्यता नाही आणि हिंदु धर्माला तर नाहीच नाही ! आपण आज सध्याच्या विज्ञान युगात ज्या पद्धतीने वागतो आहोत, त्यालाच विज्ञानाचे आव्हान आहे. सिगारेट आरोग्याला घातक आहे म्हणून विज्ञान सांगते, तरी तिचा खप कमी झाल्याचे आढळून येत नाही. टेरेलिन, टेरिकॉटचे कपडे त्वचेला चांगले नाहीत, असे विज्ञान सांगते, तरी त्या कपड्यांची फॅशन वाढतेच आहे. लहान लेकरांवरही त्याची जबरदस्ती केली जाते. पायात बूट घालून रस्त्यावरून तसेच घरात येणे हे जंतुसंसर्ग (सोर्स ऑफ इन्फेक्शन) वाढवणारे आहे, असे विज्ञान सांगते; पण काढा-घालण्याच्या कंटाळ्यापायी आपण तिकडे दुर्लक्ष करतो. आज निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. त्याला विविध प्रकारचे प्रदूषण (पोल्युशन) कारण आहे, असे विज्ञान सांगते. हे प्रदूषण (पोल्युशन) वाढविले कोणी ? देव देव करणार्या लोकांनी ? तीर्थयात्रा करणार्यांनी ? सोवळे नेसणार्या माणसांनी ? संध्या करणार्यांनी ? गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध वाचणार्यांनी ? आळंदीच्या दिंडीत समाविष्ट होणार्या लाखो भाविकांनी ? यातला कुणीही प्रदूषण वाढवत नाही. प्रदूषण वाढते, ते सध्या वापरात असलेल्या विज्ञानानेच ! त्याचे प्रकार काहीही करा. साउंड पोल्युशन, एअर पोल्युशन ! यावरून विज्ञानच विज्ञानाच्या विरोधी आहे, हे स्पष्ट होते.
धर्माच्या कोणत्या संकल्पना अशा आहेत की, ज्या विज्ञानाला विरोध करतात, असे म्हटले जाते. चौकोनी ठोकळा गोल साच्यात घट्ट दाबून बसवण्याचा प्रयत्न करावा आणि नीट बसला नाही, म्हणून तक्रार करावी, तसेच हे झाले आहे. गोल ठोकळ्याचे माप वेगळे आणि चौकोनी साच्याचे माप वेगळे ! दोन्हींमध्ये वेगळेपण असेल. विरोध येण्याचे कारण नाही.
कादंबरी छापतांना यंत्र चालू रहाते आणि ज्ञानेश्वरी छापतांना ते बंद पडते, असे तर घडत नाही ना ? तसे जर घडले, तर विज्ञानाचा धर्माला विरोध आहे, हे मान्य करता येईल. अलीकडील बुद्धिवाद्यांचा ज्ञानेश्वरीला विरोध असतो, तो वेगळ्या कारणासाठी ! ज्ञानेश्वरीने सांगितलेल्या मूलभूत तत्त्वाचा अनुभव येत नाही, मग ते सत्य कसे मानावे, असा त्यांचा आक्षेप असतो.
बुद्धिप्रामाण्यवाद्यांनो, ईश्वराविषयी बोलण्यापूर्वी हे लक्षात घ्या !
एका साहित्यिकाचा दावा आहे की, शेतकरी शेतात काम करतांना जसा माझ्या डोळ्यात दिसतो, तसे सृष्टीचा व्यापार करणारा ईश्वर मला दिसला पाहिजे. तरच मी तो आहे, असे मानीन. एका साहित्यिकाच्या मानण्या न मानण्यावर ईश्वराचे अस्तित्व थोडेच अवलंबून असते ? ईश्वराने याला भेटावे, असे याचे काय महत्त्व ? पृथ्वीच्या मानाने जेवढी मोहरी, तेवढीसुद्धा ब्रह्मांडाच्या मानाने पृथ्वी नाही. आपला जो सूर्य, तोच पृथ्वीपेक्षा तेरा लाख पट मोठा आहे आणि प्रकाशाच्या दृष्टीने आठ मिनिटांच्या अंतरावर आहे. सूर्यापेक्षा अनंतपटीने मोठे असणारे तारे आकाशात आहेत आणि पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहेत. आपल्याला ठाऊक असलेले ब्रह्मांड, असे आहे. परमेश्वराला ‘अनंतकोटी ब्रह्मांडनायक’ म्हणतात. त्याने मला काय म्हणून भेटावे ? कोण मी ? मुख्यमंत्र्याला पंतप्रधान भेटत नाही, चार-चार दिवस लुंगवत ठेवतात. आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यातील अधिकाराच्या दृष्टीने असलेल्या अंतरापेक्षा योग्यतेच्या दृष्टीने मी आणि ईश्वर यांच्यातील अंतर कितीतरी पटीने अधिक आहे. ईश्वराच्या दर्शनाची अभिलाषा अंत:करणात खरीच असेल, तर एकतर ज्ञानेश्वर-तुकारामांसारखे मोठे तरी व्हावे, किंवा रावण, कुंभकर्णासारखे उपद्रवमूल्य (न्यूसेन्स व्हॅल्यू) तरी प्राप्त करून घ्यावे. यातील काय परवडते, ते ज्याचे त्याने ठरवावे.
(संदर्भ – ‘हिंदु धर्म समजून घ्या !’ या स्वामी वरदानंद भारती यांच्या ग्रंथातील उतारे)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात