-
पुणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कांगावा
-
हिंदु जनजागृती समितीच्या विरोधात तक्रार
पुणे : चिंचवड परिसरात मूर्तीदान उपक्रमाला खीळ बसल्याने व्यथित झालेल्या अंनिसने हिंदु जनजागृती समितीच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ‘समितीचे कार्यकर्ते मानवी साखळी करून विसर्जन घाटांवर नागरिकांना नदीत मूर्ती विसर्जन करण्याची सक्ती करतात. कृत्रिम हौदात विसर्जन करण्यापासून त्यांना परावृत्त करतात. हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन आहे. प्रतिष्ठानच्या बॅनरखाली उपक्रम राबवतांना समितीच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीदान घेणार्या कार्यकर्त्यांना धमकावले. गेल्या २२ वर्षांत असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. जाणीवपूर्वक नदी प्रदूषण, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी’, असे अंनिसने तक्रारीत म्हटले आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! पोलिसांनी मोहीम बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर हिंदु जनजागृती समितीने मोहीम बंद केली होती; मात्र मूर्तीदान घेणार्यांनी पोलिसांना न जुमानता मोहीम काही वेळ बंद करून पुन्हा चालू केली. वास्तविक ‘श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे’, असे शास्त्र सांगते. कायद्याने प्रत्येकाला धर्मपालन करण्याचा, तसेच प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याचा अधिकार दिला आहे. दान घेतलेल्या, तसेच कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या मूर्तींची पुढे किती वाईट पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, याविषयीचे वास्तव आता भाविकांना कळू लागले आहे. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाचा बागुलबुवा निर्माण करून दिशाभूल करणार्या अंनिससारख्या नास्तिकतावाद्यांचा खरा चेहराही भाविकांच्या समोर येत आहे. धर्मपालन करणार्यांचे प्रमाण वाढू लागल्यानेच अंनिसकडून थयथयाट केला जात आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संदर्भातील वृत्त ‘पुणे मिरर’ या इंग्रजी दैनिकाच्या आवृत्तीत प्रसिद्ध झाले. या वृत्तात त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचेही म्हणणे छापले आहे.
‘अंनिसचे हे नेहमीचेच आरोप आहेत. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने असे कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नाहीत आणि समितीचे कार्यकर्ते विसर्जन घाटावर प्रबोधन फलक हातात धरून भाविकांना ‘शास्त्र काय आहे’, ते सांगतात. अंनिसने केलेले आरोप चुकीचे आहेत’, असे श्री. सुनील घनवट यांनी म्हटल्याचे त्यांनी यात छापले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात