गोमांसाविषयी हिंदूंच्या भावना तीव्र असतांना मंत्र्यांनी असे सांगणे लज्जास्पद !
नवी देहली : भाजपने कधीही गोमांस खाऊ नये, असे सांगितलेले नाही. आम्ही लोकांच्या खाण्याच्या पद्धतीवर रोक लावू शकत नाही. जर भाजपचे सरकार असलेल्या गोव्यामध्ये गोमांस खाण्यावर स्वातंत्र्य आहे, तर केरळमध्येही लोकांना याविषयी कोणतीही अडचण होणार नाही, असे विधान नवनियुक्त केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फोन्स कन्ननथानम् यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. कन्ननथानम् हे मूळचे केरळ राज्यातील ख्रिस्ती धर्मीय आहेत. ते भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.
कन्ननथानम् पुढे म्हणाले, मी ख्रिस्ती समाज आणि भाजप यांच्यातील पुलाचे काम करणार आहे. पक्षाकडून यापूर्वी ठरवण्यात आलेल्या सूत्रांविषयी त्यांच्याशी बोलेन. लोकसभा निवडणुकीपूर्वी असे म्हटले जात होते की, मोदी सरकार आल्यावर चर्च तोडले जातील, ख्रिस्त्यांना मारले जाईल. हे केवळ खोट्या गोष्टी पसरवण्याचे षड्यंत्र होते. पंतप्रधान मोदी यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही तुम्हाला कसे सादर करायचे ते स्वतःच ठरवू शकता. देशातील सर्व लोकांना जोडण्याचे मोदी यांनी चांगले काम केले आहे, असेही कन्ननथानम् म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात