नंदुरबार : गणेशोत्सवाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीचे कार्य अभिनंदनीय आहे, असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रमेश पवार यांनी या वेळी व्यक्त केले. येथे गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीने सोनारवाडी येथे आयोजित केलेल्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलक प्रदर्शनीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पहिल्या दिवसापासूनच उदंड प्रतिसाद मिळाला. सहस्रो गणेशभक्तांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचा भाग म्हणून शहरातील मानाचा दादा गणपति असलेल्या सोनारवाडी या ठिकाणी सनातन संस्थेच्या संत पू. केवळबाई पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. श्री. रमेश पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महामंडलेश्वर रामचैतन्य महाराज यांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. गणेशोत्सव कसा असावा आणि कसा नसावा या विषयावरील ध्वनीचित्रफीत लक्षवेधी ठरली.
काही मंडळाच्या पदाधिकार्यांनी भेट दिली असता त्यांनी सांगितले, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अशाच प्रकारे उत्सव साजरा करण्याचे आवाहन करू. अपप्रकार थांबवण्यासाठी प्रबोधन करू. येथे पहाण्यासाठी ठेवलेली शाडूमातीची सात्त्विक गणेशमूर्ती हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात