पाश्चात्त्य देशांतील चर्चमधील पाद्य्रांकडून महिला आणि लहान मुले यांच्या लैंगिक शोषणाच्या सहस्रो घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत आणि या प्रकरणी अनेकांना हानीभरपाईही द्यावी लागली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : मुंबईमधील माहीम येथील सर्वांत जुन्या असणार्या सेंट मायकल चर्चमध्ये काही दिवसांपूर्वी महिलांच्या प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्याचे समोर आले होते. यावर आता आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड गेसियस यांनी चर्चला पत्र लिहून अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरा लावून काय साध्य करण्यात येणार होते ?, असे विचारले आहे. हे चर्च पोर्तुगिजांनी वर्ष १५३४ मध्ये बनवले आहे.
असोसिएशन ऑफ कंसर्न्ड कॅथोलिक्सचे उपाध्यक्ष केरेन सी. डिसूजा यांनीही चर्चला पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सेंट मायकल चर्चचे पाद्री प्रतिदिन हास्यास्पद का होत आहेत ? कॅमेरा लावून ते काय चित्रीत करणार होते ? हे संपूर्णपणे महिलांच्या वैयक्तिक गोष्टीचे उल्लंघन आहे. कृपया तुमच्या पाद्रींना सांगा की, त्यांनी आता जागे व्हावे आणि महिलांच्या संदर्भात भावनिक होऊ नये. आम्हाला हे अपेक्षित नाही की, येथे लोक लाईव्ह पॉर्न बघण्यासाठी जमावेत. चर्च लवकरच यावर निर्णय घेऊन सीसीटीव्ही काढून टाकेल. सीसीटीव्ही लावण्यामागे असलेले चर्चचे पाद्री सिमॉन बोर्ग्स यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी येथे चोरीची घटना घडली होती. त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि चोरीच्या घटना रोखाव्यात, यासाठी बेसीनजवळ सीसीटीव्ही लावण्यात आले.
यावर डिसोजा यांनी म्हटले की, जर प्रसाधनगृहातील साहित्यांच्या चोरीची इतकीच चिंता होती, तर बाहेर सुरक्षारक्षक ठेवता आले असते. जर चोर एखाद्या प्रसाधनगृहात गेला असेल आणि त्याला समजले की, येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, तर त्याची स्थिती कशी होईल, याचा विचार करायला हवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात