Menu Close

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे घाटाच्या ठिकाणी आढळलेल्या अयोग्य गोष्टी

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या विविध घाटांवर अनेक अयोग्य आणि अशास्त्रीय गोष्टी आढळल्या. त्या येथे देत आहोत.

पुणे शहर

१. एस्.एम्. जोशी पूलाजवळ व्होडाफोनच्या वतीने नदीलगत पर्यावरणपूरकतेच्या नावाखाली कृत्रिम हौद ठेवण्यात आला होता.

२. काही शाळेतील विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला होता. त्या गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. (शालेय विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती विसर्जनाची अशास्त्रीय कृती करण्याची सूचना देणे आणि तसे करून घेणे, हे दोन्ही चुकीचेच ! असे करून संबंधितांनी धर्महानीच केली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर घाटावर काही मुले गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर तेथील वाळू हवी असल्यास १० रुपयांना विकत होती.

४. काही ठिकाणी हनुमानाच्या वेशातील काही लहान मुले भीक मागत होती; मात्र पोलिसांचे त्याकडे लक्ष नव्हते. (धर्मशिक्षणाच्या अभावीच देवतांचा वेश परिधान करून भीक मागण्याचे प्रकार होत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५. वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर घाट येथे दैनिक सकाळ आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेच्या अंतर्गत कार्यकर्ते रस्त्याच्या मधोमध उभे राहून निर्माल्य दान करण्याचा, तसेच गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा आग्रह करत होते. (नदीचे वर्षभरात सांडपाणी आणि रासायनिक द्रव्ये यांद्वारे होत असतांना ही दोन्ही आस्थापने कोठे असतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

हनुमानाच्या वेशातील भीक मागणारा मुलगा

चिंचवड

१. काकडे पार्क घाट येथे विसर्जनाची सोय चांगली होती; पण दान म्हणून घेतलेल्या मूर्तीही हौदाच्या कठड्यावरच ठेवल्या होत्या. रावेत येथेही काही जणांकडून कठड्यावर नुसत्याच गणेशमूर्ती ठेवून दिल्या जात होत्या. (अशा प्रकारे धर्मशिक्षणाच्या अभावी अयोग्य कृत्य करणार्‍यांवर श्री गणेशाने तरी कृपा का करावी ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. मोरया गोसावी मंदिर घाट येथे निर्माल्याचे कुंड भरून वाहत होते. काही लोक त्यातील फळे काढून घेत होते. (धर्मशिक्षणाच्या अभावी होत असलेल्या अयोग्य कृती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. बिर्ला घाटावरील मूर्ती ट्रॅक्टर मधून नेण्यात आल्या. येथे नदीपात्राजवळ बांधण्यात आलेल्या संरक्षक बांबूंमुळे भाविकांची गैरसोय होत होती. विसर्जन घाटावर उतरतांना भाविकांना कसरत करावी लागत होती. पोलिसांकडून पायरीवर मूर्ती ठेवून आरती करू नये, असे सांगितले जात होते; पण इतर कोठेही पूजेसाठी जागाच उपलब्ध केली नव्हती. घाटावर विसर्जन करण्यासाठी जाणारा मार्ग दोरी लावून बंद केला होता. मूर्तीदान आणि निर्माल्य दान घेणारे, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी असलेली मुले यांचीच गर्दी अधिक झाल्याने भाविकांची गैरसोय होत होती. प्राज, टाटा मोटर्स यांच्या कर्मचार्‍यांकडून मूर्तीदान घेतले जात होते.

बिर्ला घाट येथे दान घेतलेल्या मूर्ती

येथील आेंकारेश्‍वर पुलानजिक असलेल्या विसर्जनघाटांना जोडणारा पूल बांबू लावून येण्या-जाण्यास बंदिस्त करण्यात आला होता. हा एकप्रकारे भाविकांना नदीत विसर्जन करण्यासाठी जाण्यास अटकावच होता. याविषयी भाविकांनी सांगितल्यावर काही काळाने बांबू काढून टाकण्यात आले. (प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी केली जाणारी अघोषित बंदी असे म्हटल्यास चुकीचे काय ? प्रशासनाची चूक लक्षात आणून देणार्‍या भाविकांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

ओंकारेश्‍वर घाट येथे पोलीस निरीक्षक विठ्ठल दरेकर यांनी नदीत विसर्जन करणार्‍या मुलांना हटकले आणि सर्वांची नावे लिहून घेतली. नदीत आतमध्ये जास्त जाऊ नका; नाहीतर कारवाई करू अशा सूचना दिल्या. एका मुलाला दटावलेही.

राजाराम पूल येथे कृत्रिम हौदातील विसर्जित मूर्ती लगेचच ट्रकमध्ये

राजाराम पूल येथे विसर्जनासाठी कृत्रिम टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याच्या मागेच झालरीच्या आड ट्रक उभारून गणेशमूर्ती ट्रकमध्ये भरण्यात येत होत्या. कृत्रिम हौदात पालिकेचे कर्मचारीच विसर्जन करत होते. भाविक टाक्यापर्यंत येऊ नयेत; म्हणून पटलांची रांग केली होती. भाविक तेथूनच विसर्जनासाठी मूर्ती देत होते. मूर्ती दिल्यानंतर झालरीच्या आडून पालिकेचे कर्मचारी लगेचच त्या गणेशमूर्ती ट्रकमध्ये भरत होते. त्यातील गणेशमूर्ती वाघोली येथील खाणीत टाकणार असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

सायंकाळच्या सुमारास दै. ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा तेथील कर्मचार्‍यांनी त्यांना इथे नागरिक थांबू शकत नाहीत, असे सांगून हटवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार असल्याचे समजल्यावर तेथील पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी सदर बातमी आणि छायाचित्र न छापण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बातमी छापू नका, असे स्पष्ट शब्दांत सांगितलेही.

विसर्जनाच्या वेळी आढळून आलेल्या अशास्त्रीय कृती

रावेत घाट येथे हौदात तरंगणार्‍या मूर्ती

१. विसर्जनासाठी आलेल्या एका कुटुंबातील व्यक्तीने गणपतीच्या उजव्या दंडाला फुग्यांची दोरी बांधली होती. ते फुगे हवेत उडत होते.

२. एक व्यक्ती २ फुटी फायबरची गणेशमूर्ती विसर्जन न करता तशीच कठड्यावर ठेवून दिली. तेथील मुले त्या मूर्तीवर बसून खेळत होती.

३. रावेत घाट येथील हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती काही वेळाने तरंगून वर येत होत्या. त्या मूर्तींचे हात, मुकुट भंग पावले होते. या मूर्ती अतिशय अयोग्यपणे हाताळून बाहेर काढून ठेवण्यात येत होत्या.

४. काही जण हौदातील पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत होते.

५. राजाराम पूल येथे खडकवासला येथील उत्तमनगरचे रहिवासी गणेशमूर्ती दानही घेत होते.

६. नर्‍हे येथे ‘देव द्या, देवपण घ्या !’या मोहिमेच्या अंतर्गत गणेशमूर्तींचे दान घेण्यात येत होते. (अशास्त्रीय मोहिम आणि अयोग्य कृती करणारे यांवर श्री गणेशाने कृपातरी का करावी ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *