बर्थडे हवन या अँड्रॉइड अॅपचे अनावरण
मुंबई : सद्यस्थितीला बहुतांश लोक आपला वाढदिवस शास्त्रविसंगत अशी मेणबत्ती फुंकून आणि केक कापून साजरा करतात. वाढदिवस म्हणजे मौजमजा करणे अशी काहीशी समजूत लोकांमध्ये रूढ होत चालली आहे. वाढदिवस हा प्रत्येक वर्षी येणारा जीवनातील एक महत्त्वाचा दिवस असून या दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी सर्वांनी प्रार्थना करायची असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील पवई येथील धर्मप्रेमी श्री. रूपेश शर्मा यांनी बर्थडे हवन ही संकल्पना राबवली आहे. हिंदूंनी आपल्या संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा करावा यासाठी त्यांनी बर्थडे हवन ही संकल्पना अमलात आणली आहे. ३ सप्टेंबर या दिवशी पवई येथील श्री अय्यप्पा विष्णु मंदिर येथे बर्थडे हवन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. पुराहितांनी ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीचे नाव आणि नक्षत्र घेऊन आयुष्य हवन केले. ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. बर्थडे हवन या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे त्यानिमित्ताने या कार्यक्रमाच्या अँड्रॉइड अॅपचे अनावरण प्रसिद्ध लेखक श्री. रतन शारदा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्री. रूपेश शर्मा यांनी उपस्थितांना अग्नीचे महत्त्व सांगून वाढदिवस हिंदु धर्माप्रमाणे साजरा करण्याचे महत्त्व सांगितले. २५ भाविकांनी या हवनाचा लाभ घेतला. या वेळी चिन्मय मिशनची बालसाधिका कु. साची हिने श्रीमद्भगवतगीतेतील श्लोकांचे पठण केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात