एम्.आय.टी. महाविद्यालय अशीच मोहीम मोहरमचे ताबूत नदीमध्ये विसर्जित होत असतांना राबवणार का ? महाविद्यालय अशा प्रकारची मोहीम वर्षभर नदी प्रदूषित होत असतांना का राबवत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : येथील आळंदीमधील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी एम.आय.टी., आळंदी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्हिजनरी फायटर्सद्वारे नदीमध्ये विसर्जन झालेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती नदीतून बाहेर काढल्या. नदीमध्ये दीड, ७ आणि १२ दिवसांचे गणपती विसर्जन झाले होते. या वेळी ८ सहस्र मूर्ती दानही करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे या सगळ्या मूर्ती बाहेर काढल्या. गेल्या ३ वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो. इंद्रायणी नदीतून बाहेर काढलेल्या सगळ्या गणेश मूर्ती आळंदी नगरपरिषदेला देण्यात येणार आहेत.
नदीतून गणेशमूर्ती बाहेर काढण्याच्या संदर्भात ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी दिलेली प्रतिक्रिया
प्रशासन हिंदूंच्या भावनांची दखल घेत नाही, ही शोकांतिका ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड
आळंदी, पवना, तसेच अन्य नद्यांमध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा नदीपात्रातून बाहेर काढण्याच्या घटना घडल्या. असे करणे ही मूर्तींची विटंबनाच आहे. पुण्यातही कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. वास्तविक श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यात झाले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने हिंदूंच्या धर्मभावना लक्षात घेऊन नदीला मुबलक पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. मातीच्या मूर्तींमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. हिंदूंच्या सणांच्या वेळी आवाज उठवणारे तथाकथित पर्यावरणवादी बकरी ईदच्या दिवशी होणार्या प्राणीहत्येविषयी, तसेच प्रदूषणाविषयी काहीच बोलत नाहीत. हिंदू सहिष्णु असल्यानेच त्यांच्या संदर्भातच असे प्रकार घडू दिले जातात. प्रशासनही याविषयी हिंदूंच्या भावनांची दखल घेत नाही, ही शोकांतिका आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
सोलापूर येथे अशास्त्रीय पद्धतीने कृत्रिम हौदात गणेशमूर्ती विसर्जन !
सोलापूर : येथील शेळगी परिसरातील देशाभिमान मित्र मंडळाने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळाकडे जमा झालेल्या वर्गणीतून २५ सहस्र रुपये व्यय करून कृत्रिम हौद सिद्ध केला.
प्रती वर्षी विसर्जन करण्यात येणार्या विहिरीमध्ये अस्वच्छ पाणी असल्याने कृत्रिम हौद सिद्ध केला असल्याचे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धाराम नागशेट्टी यांनी सांगितले.
(कृत्रिम हौदात गणेशमूर्ती विसर्जन करणे शास्त्राच्या विरुद्ध आहे. गणेशभक्तांनी दिलेल्या वर्गणीतून कृत्रिम हौद सिद्ध करण्यापेक्षा विहिरीतील घाण स्वच्छ करण्यास व्यय केला असता, तर सर्व गणेशभक्तांना त्याचा लाभ झाला असता. – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात