Menu Close

महाराष्ट्र : गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रबोधन

कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रविसंगत विसर्जन न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बोरीवली येथे प्रबोधन

हस्तफलक घेऊन प्रबोधन करतांना समितीचे कार्यकर्ते

मुंबई : बोरीवली पूर्व येथील दत्तपाडा परिसरातील महानगरपालिकेच्या मनोरंजन मैदानात महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. येथून अनुमाने एक किलोमीटर अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वहात्या पाण्याचा नैसर्गिक स्रोत उपलब्ध असतांनाही पालिकेने शास्त्रविसंगत अशा कृत्रिम तलावाची बांधणी करून जनतेच्या पैशाचा अकारण व्यय केला होता. पालिकेच्या या धर्मविरोधी उपक्रमाविषयी गणेशभक्तांमध्ये जागृती व्हावी आणि विसर्जनाविषयीचे शास्त्र भक्तांना अवगत व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी येथे हातात हस्तफलक घेऊन प्रबोधन केले. गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयीचे शास्त्र सांगणारे हस्तफलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. या वेळी प्रबोधनपर हस्तपत्रकांचेही वाटप करण्यात आले.

क्षणचित्रे

१. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कृत्रिम तलावात केवळ १२ मूर्तींचे विसर्जन झाले.

२. स्थानिक नगरसेविका सौ. आसावरी पाटील यांनी विषय ऐकून घेतला आणि सध्या गणेशोत्सवाच्या काळात वाजवले जाणारे कर्णकर्कश डिजे संगीत, अवाढव्य मूर्ती आणणे यांसारख्या अपप्रकारांविषयी अनास्था व्यक्त केली.

३. या वेळी रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे नागरिक थोडा वेळ थांबून प्रबोधनपर हस्तफलकावरील लिखाण वाचत होते.

४. ‘पुढील वर्षी आम्ही वहात्या पाण्यात विसर्जन करू’, असे घरगुती गणपती घेऊन आलेल्या दोन गणेशभक्तांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


फलटण (जिल्हा सातारा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्याने कृत्रिम हौद ओस पडले !

फलटण नगरपरिषदेने सिद्ध केलेला कृत्रीम हौद असा ओस पडला होता

फलटण (जिल्हा सातारा) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा’ याविषयी फलक प्रसिद्धी, भित्तीपत्रके, हस्तपत्रके, व्याख्यान यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले होते. त्याचा परिणाम म्हणून अनंत चतुर्थीला फलटण नगरपरिषदेने शहरात दोन ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रीम हौद सिद्ध केले होते. त्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती विसर्जनाचे आध्यात्मिक महत्त्व सांगून प्रबोधन केल्यावर अनेकांनी कृत्रिम हौदात मूर्तीविसर्जन करण्याकडे पाठ फिरवत वहात्या पाण्यातच विसर्जन करणे पसंत केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


फलटण (जिल्हा सातारा) येथील जयमल्हार तालीम गणेशोत्सव मंडळाचे रांगोळीच्या माध्यमातून गणेश भक्तांचे प्रबोधन !

श्री गणेशमूर्ती दान करू नका; तर वहात्या पाण्यात विसर्जित करा !

भक्तांनी काढलेली रांगोळी

फलटण (जिल्हा सातारा) : हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या धर्माभिमान्यांना श्री गणेशमूर्ती विसर्जनाचे शास्त्र सांगितल्यावर त्यांनी हा विषय सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथील रविवार पेठेतील जय मल्हार तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने धर्माभिमानी सर्वश्री मनोज चव्हाण, अमित रावळ, सचिन भांडवलकर आणि शंकर चव्हाण यांनी गणेशोत्सव मंडळासमोर रांगोळीच्या माध्यमातून श्री गणेशमूर्ती दान न देता तिचे वहात्या पाण्यात विसर्जन करा !, असे प्रबोधन केले. त्यामध्ये रांगोळीने ‘कराल योग्य विसर्जन कृती, तरच होईल श्री गणेशाची कृपादृष्टी !’, ‘धर्मशास्त्रानुसार मूर्ती विसर्जन करा !’ तसेच ‘श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यातच विसर्जन करा !’ असे प्रबोधनपर लिखाण केले होते. (श्री गणेशोत्सवातील विसर्जन कृतीचे शास्त्र सांगण्यासाठी रांगोळीच्या माध्यमातून सर्वांचे प्रबोधन करणार्‍या जयमल्हार तालीम गशणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *