स्वसंरक्षण अन् प्रथमोपचार प्रशिक्षण या दोन्हींचे वर्ग चालू करण्याची मागणी
पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदू, तेजा जाग रे !’ या विषयावरील शौर्यजागरण नाटिका अन् प्रथमोपचार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या वेळी मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांसह समाजातील अनेक युवक-युवती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी स्वसंरक्षण अन् प्रथमोपचार प्रशिक्षण या दोन्हींचे वर्ग चालू करण्याची मागणी केली, तसेच अनेकांनी या उपक्रमांचे कौतुक केले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. मॉडर्न महाविद्यालय येथील विद्यार्थिनींचा गट, संगीत चित्रकला संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी, कोंढवा आणि कोथरूड येथील युवकांचा गट अशा ४ गटांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण अन प्रथमोपचार शिकवण्याची मागणी करत नाव नोंदणी केली.
२. अखिल जनवाडी गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशाची आरती समितीचे श्री. विजय चौधरी यांच्या हस्ते केली.
३. समिती मोठे कार्य करत आहे, असे सांगून अखिल जनवाडी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. विनोद सक्कट यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला.
४. अखिल जनवाडी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी प्रात्यक्षिक झाल्यावर तेथील स्थानिक महिलांनी समितीच्या कार्यकर्तीला सांगितले की, आम्ही महिलांचे एकत्रीकरण करतो आणि तुम्ही लवकरात लवकर आम्हाला प्रथमोपचाराची सर्व माहिती द्या आणि वर्ग चालू करा, तसेच मंडळाच्या युवक कार्यकर्त्यांना बोलावून प्रशिक्षणवर्ग चालू करण्याचे नियोजन करण्यास सांगितले.
५. गरुड मित्र मंडळाचे श्री. सुनील कुंजीर यांनी पथनाट्य पाहिल्यानंतर आपल्या भागातील महानगरपालिका शाळेची अनुमती घेऊन आठवड्यातून १ घंटा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची सोय करून देतो, तसेच आजूबाजूच्या वसतिगृहामध्ये असणाऱ्यां तरुणांची मी ओळख करून देतो. तुम्ही त्यांचे प्रबोधन करा.
६. गोपाळकृष्ण विकास मंडळाच्या महिलांनी सांगितले की, आमचे महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. पुन्हा एकदा आमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करा आणि सविस्तरपणे माहिती द्या.
७. फणीआळी तालीम येथे शौर्यजागरण नाटिका पाहून धायरी येथील ६ युवकांच्या गटाने ’प्रशिक्षण वर्गाला आम्ही येणार आणि कुठे यायचे, ते सांगा’, असे सांगून संपर्क क्रमांकही दिले.
पिंपरी-चिंचवड
आळंदी येथील वृंदावन होम्स सोसायटी आणि एम्पायर इस्टेट येथे, तर खडकी अन बोपखेल येथील मानाजी बाग गणेश मंडळ आणि हिंद केसरी मित्र मंडळ येथे शौर्यजागरण नाटिका दाखवण्यात आली. याचा लाभ सरासरी १५० हून अधिक जणांनी घेतला. या वेळी अनेकांनी विविध सकारात्मक अभिप्राय व्यक्त केले. आळंदी येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची मागणीही उपस्थितांनी केली.
गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिप्राय !
समितीसारखे काही जण आहेत, म्हणून हिंदु धर्म टिकून आहे आणि काही धार्मिक गणेशोत्सव मंडळे आहेत, म्हणून गणेशोत्सवाचे पावित्र्य टिकून आहे. – श्री. प्रितेश केदारी, अध्यक्ष, रिद्धीसिद्धी गणपती मंडळ
मंडळाच्या माध्यमातून समितीचे उपक्रम राबवूया, तसेच गणेशोत्सवानंतर भेटून त्याविषयी ठरवूया. – श्री. पांडुरंग पवार, संस्थापक अध्यक्ष, लोकशिक्षण मित्र मंडळ
समाजासाठी समितीचे मोठे कार्य चालू आहे. समाजासाठी असे उपक्रम घेणारे फारच अल्प आहेत. समाज कार्यासाठी काही साहाय्य लागल्यास आमचे मंडळ तुम्हाला साहाय्य करेल. – श्री. अमित झांझले, अध्यक्ष, नगरकर तालीम मित्र मंडळ
गोपाळकृष्ण विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. विलास काळे हे दिवाळीमध्ये माता गौरव कार्यक्रम घेणार आहेत. त्यामध्ये समितीचे व्याख्यान आणि प्रात्यक्षिक यांचे नियोजन करूया.
फणीआळी तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र खराडे म्हणाले की, तुमचा उपक्रम पुष्कळ चांगला आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे.
गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सागर दहिभाते यांनी सांगितले की, समितीच्या साहाय्याने आम्ही कोणकोणते उपक्रम करू शकतो, ते सर्व उपक्रम आम्ही करू आणि आमच्या मंडळात तुम्ही कधीही हक्काने येऊन समाजासाठी काहीही कार्य करण्याचे साहाय्य मागू शकता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात