आखाडा परिषदेने १४ भोंदू बाबांची सूची घोषित केल्याविषयी सनातनची भूमिका
१. सध्या संतसमाजाचा जो अपमान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. आखाडा परिषद संत-महंतांचे प्रतिनिधित्व करते. आखाडा परिषदेने हिंदु धर्मातील महान संतपरंपरेच्या शिकवणीचे पालन करून अपप्रवृत्तींच्या चुकांवर पांघरूण न घालता समाजाला हानी पोहोचवणार्या भोंदू संतांची नावे उघड केली आहेत.
२. अपप्रवृत्ती सर्वच क्षेत्रांत असतात. यात एन्.डी. तिवारी यांच्यासारखे राजकारणी, तेजपाल यांच्यासारखे पत्रकार याही अपप्रवृत्तीच आहेत. आज इतर कोणत्याही क्षेत्रातून त्यातील अपप्रवृत्तींच्या विरोधात कोणतीही कृती होतांना दिसत नाही; मात्र या पार्श्वभूमीवर संतसमाजाने उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटते. इतर क्षेत्रांत अपप्रवृत्तींची पाठराखण करण्यासाठी त्यांच्या गुन्ह्यांवरील कारवाईला सूडबुद्धीने केलेल्या राजकारणाचा रंग दिला जातो, सत्य दडपण्यासाठी दबाव आणला जातो. या पार्श्वभूमीवर संतसमाजाने पुढे येऊन समाजातील सर्वच क्षेत्रांना धडा घालून दिला आहे.
३. एकप्रकारे आपल्याच क्षेत्रातील भोंदू व्यक्ती घोषित करणे, हे धैर्याचे आहे; मात्र धर्मसंस्कृतीची शिकवण देणार्या आणि हिंदूंचे धर्मांतर थांबवणार्या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे नाव सूचीत येणे धक्कादायक आहे. त्यांच्यावर चाललेल्या खटल्यामुळे त्यांना भोंदू ठरवण्यात आले असेल, तर त्यांची निर्दोष सुटका झाल्यास आखाडा परिषद या निर्णयाचा पुनर्विचार करील, अशी आशा आहे; मात्र या अनुषंगाने काही प्रश्न सर्व क्षेत्रांतील प्रतिष्ठाप्राप्त मंडळींना विचारावेसे वाटतात !
अ. हिंदूंच्या धार्मिक क्षेत्राशी निगडीत हा निर्णय आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचा खटला चालू आहे; म्हणून भोंदू ठरवले गेले, तर दुसर्या बाजूला केवळ हिंदूंच्याच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या आर्थिक, बौद्धिक, सामाजिक क्षेत्रांशी निगडित असणार्या राज्ययंत्रणेमध्ये मात्र शेकडो आमदार आणि खासदार गंभीर गुन्ह्यांचे आरोपी आहेत. आज गुन्हा सिद्ध झाल्यास खुर्ची खाली करा, स्वत:वरील गुन्ह्यांची माहिती जनतेला द्या, हे राजशकटाला सर्वोच्च न्यायालयाने खडसवावे लागते. असे का ?
आ. संविधान सर्वांत पवित्र असा जाहीर उद्घोष करणारी संसद, विधीमंडळे स्वत:वर असे कठोर नियम कधी लादून घेणार आहेत ? गुन्हा सिद्ध झाल्यास नव्हे, तर केवळ आरोप असल्यावरही खुर्ची खाली करण्याचे नैतिक धारिष्ट्य हे सत्तालोलूप दाखवतील का ?
इ. हा प्रश्न इथेच संपत नाही. समाज सुधारणेच्या नावाखाली स्वत:ची तुंबडी भरून घेणारेही स्वत:ला श्रेष्ठ आणि पवित्र समजत असतातच. हे आमच्यातील भोंदू समाजसेवक, हे आपल्यातील भ्रष्ट आणि दलाल पत्रकार, हे आमच्यातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट कंत्राटदार अशा सूची या समाजात कधी प्रसिद्ध होतील का ? विस्तारभयामुळे ही सूची इथेच थांबवावी लागेल; मात्र मोठी आहे हे खरे.
ई. हे आमच्यातील वासनांध, भोंदू आणि भ्रष्टाचारी पाद्री असे पोप कधी घोषित करतील का ? किंवा अशा आशयाचा फतवा कधी निघेल का ? असे प्रश्न जनतेला पडत असतीलच. आसारामबापूजी यांच्या निमित्ताने हे सूत्र पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे हे मात्र खरे.
– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात