पुणे : पुण्यातील सांडपाण्यामुळे नद्यांची गटारे झालेली असतांना वर्षाचे ३६५ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी संघटना यांना हिंदूंचा गणेशोत्सव आला की प्रदूषणाविषयी जाग येते. यातील गंभीर गोष्ट म्हणजे या संघटनांकडून स्वतःचे कार्यकर्ते आणण्याऐवजी विसर्जनाच्या कालावधीत भाविकांनी गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात सक्तीने विसर्जन करण्यासाठी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपवापर केला जात आहे. हा प्रकार घटनेच्या धर्मनिरपेक्षता आणि धर्मस्वातंत्र्य या तत्त्वांना हरताळ फासणारा आहे. तसेच उद्या अशा सार्वजनिक ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडल्यास त्या विद्यार्थ्यांच्या जीविताची हमी या पुरोगामी संघटना देणार आहेत का ? हीच गोष्ट हिंदु जनजागृती समितीने सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांच्या लक्षात आणून दिली.
त्यावरून अंनिस, बेगडी पुरोगामी आणि पर्यावरणवादी यांनी शिक्षण विभागाच्या निर्णयावर टीकेची झोड उठवून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि शासनाने अशा हिंदूविरोधी दबावाला बळी पडू नये, असे आवाहन करतो, असे हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, याच अंनिसने वर्ष २०११ मध्ये वैज्ञानिक तर सोडा, काडीचाही अभ्यास न करता कागदी लगद्यांपासून गणेशमूर्ती ही संकल्पना मांडली. तत्कालीन काँग्रेस शासनाने अंनिसवर अंधविश्वास ठेवून प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्तीस चालना देणारा अवैज्ञानिक शासन निर्णय ३ मे २०११ या दिवशी प्रसिद्ध केला. पुढे कागदी लगद्याची मूर्ती प्रचंड प्रदूषणकारी असल्याचे मान्यताप्राप्त शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था, माटुंगा यांच्या प्रयोगशाळेत सिद्ध झाले. परिणामी त्या निर्णयाला ३० ऑक्टोबर २०१६ या दिवशी मा. राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली. यामुळे शासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ न्यायालयात अक्षरश: तोंडघशी पडले.
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण, ताबूतांचे आणि नाताळच्या वेळी थर्माकॉलचे पाण्यातील विसर्जन, बकरी-ईदनिमित्त लाखोंच्या संख्येने होणार्या प्राणी हत्या यांमुळेही जलप्रदूषण होते. यांविषयी अंनिस, बेगडी पुरोगामी आणि तथाकथित पर्यावरणवादी यांनी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने मोहीम रावबवण्याचे धारिष्ट्य करावे. त्यांच्यात ही प्रामाणिकता आणि तत्त्वनिष्ठता नसल्याने अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी ते मूग गिळून गप्प बसतात. त्यामुळे त्यांनी हिंदूंच्या सहिष्णूतेचा अपलाभ उठवू नये. शासनाने अंनिस आणि या मंडळींच्या वैज्ञानिक भोंदूगिरीला आणि कथित पर्यावरणवादाच्या भूलथापांना बळी पडू नये, तसेच सरकारी धोरणांशी आणि भाविकांच्या धर्मभावनांशी घटनात्मकदृष्ट्या सुसंगत निर्णय घेणार्या अधिकार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, अशी आमची मागणी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात