गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा वापर झाल्याचे पुन्हा उघड !
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी असूनही त्यांचा सर्रास वापर करण्यात येतो आणि शासन ते रोखू शकत नाही. याचाच अर्थ केवळ कायदे करून उपयोग नसतो, तर त्यांची कार्यवाही करणारे शासनकर्तेही हवेत. याचप्रमाणे गोव्यात गायीच्या आणि अल्प वयाच्या गोवंशाच्या हत्येवर बंदी आहे, तरीही गोवा मांस प्रकल्पासह इतर ठिकाणीही गाय आणि अल्पवयीन गोवंश कापला जाण्याच्या घटना घडतात. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वास्को : गणेशोत्सवात मडगाव येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा वापर झाल्याची घटना ताजी असतांनाच आता चिखली येथेही असाच प्रकार उघडकीस आला आहे. नुकत्याच चिखली येथील नाल्यात विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुमारे १५ गणेशमूर्ती भग्न अवस्थेत दिसू लागल्या आहेत. या प्रकाराविषयी स्थानिकांमध्ये नाराजी आहे. गणेशमूर्तीसंदर्भात पवित्रता जपण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचाच वापर करावा, असे मत आता जोर धरू लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार ९ सप्टेंबरला या गणेशमूर्ती भग्नावस्थेत पाण्यात दिसू लागल्या. काही नागरिकांच्या मते, चिखली पंचायत कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात कचर्याप्रमाणे या मूर्ती पडल्या आहेत. ही त्यांची विटंबना आहे. वास्तविक चिखली पंचायतीने गणेशमूर्ती विसर्जन चिखली अथवा बोगमळो येथील समुद्रात करण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. एका स्थानिक नागरिकाने म्हटले की, चिखली नाल्यात कित्येक वर्षांपासून गणेशमूर्ती विसर्जन केले जाते. नाल्यातील पाणी समुद्रात वाहून जाते; मात्र नाल्यात कचरा आणि गाळ साचल्याने पाण्याचा प्रवाह रोखला जात आहे. स्थानिक नागरिक अनिल नाईक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, लोकांना वारंवार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा वापर न करण्यासंदर्भात सांगण्यात येत आहे; मात्र स्वस्त, वजनाने हलक्या आणि दिसायला आकर्षक असल्याने अनेक जण प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच गणेशमूर्ती आणतात. स्थानिक नागरिक गणराज देसाई यांनी म्हटले की, अर्धवट विरघळलेल्या आणि भग्ग मूर्ती पाहून मला खूप वाईट वाटले. चिखली पंचायतीचे उपसरपंच कमलाप्रसाद यादव यांच्या मते, या ठिकाणी चिखली आणि दाबोळी परिसरातील सुमारे ५० गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते आणि यामधील काही मूर्ती आता दिसू लागल्या आहेत. चिखली पंचायत या गणेशमूर्ती पुनर्विसर्जित करण्याची व्यवस्था करणार आहे. तसेच पुढील वर्षी गणेशमूर्ती अशा प्रकारे तरंगू नयेत, यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे. पुढील वर्षी दाबोळी येथे खुल्या जागेत मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तळे बांधण्यात येणार आहे. दाबोळीचा राजा या सार्वजनिक गणेशमूर्तीचेही तेथे विसर्जन करण्याची सोय करण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात