४० हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती
पुणे : कोट्यवधी रुपये खर्चून केली गेलेली किल्ले सिंहगडाची डागडुजी निकृष्ट दर्जाची झाली आहे. याविरोधात ‘शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचारापासून वाचवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आयोजित केलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत सिंहगडाच्या संवर्धन कामांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा एकमुखाने निर्धार करण्यात आला. ९ सप्टेंबर या दिवशी सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे झालेल्या बैठकीत विविध संघटनांचे ४० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर श्री. शंभू गवारे यांनी किल्ले सिंहगडाच्या निकृष्ट दर्जाच्या डागडुजीविषयी पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना माहिती दिली. बैठकीच्या शेवटी भ्रष्टाचाराच्या विळख्यातून गडकिल्ले वाचवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करावेत, याविषयी चर्चा करून मोहिमेची दिशा ठरवण्यात आली.
या वेळी डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागातील एका संशोधकांनी गडसंवर्धनाची कामे चुकीच्या पद्धतीने होण्याच्या कारणांचा मागोवा घेतला. ते म्हणाले, ‘‘किल्ले संवर्धनाची कामे नेमकी कशा पद्धतीने करावीत, याविषयी शासनाने नेमलेल्या दुर्ग संवर्धन समितीने सुचवलेल्या सूचनांचे पालन होत नाही. त्यामुळे संवर्धनाची कामे मनमानी पद्धतीने केली जातात. पुरातत्व विभागाकडे गडकिल्ल्यांचे दायित्व असले, तरी आज २५० किल्ले वनविभागाच्या अखत्यारित आहेत. संवर्धनाची कामे करण्यासाठी जी जुन्या पद्धतीची साधनसामुग्री वापरायला हवी, ती वापरली जात नाही. माहितगार नसणार्या व्यक्तींकडून प्रत्यक्ष डागडुजीची कामे केली जातात. अशा कारणांमुळे त्याचा दर्जा चांगला रहात नाही. या विरोधात सर्वांनी आवाज उठवला, तर आपण यशस्वीतेकडे वाटचाल करू.’’
सिंहगड पावित्र्य मोहिमेचे श्री. नितीन वाघ यांनी गडांवर होणार्या डागडुजीच्या कामांवर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले, तर ह.भ.प. मंचक महाराज यांनी गडांवर होणारे मद्यपान, धिंगाणा असे अपप्रकारही रोखले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. अधिवक्ता प्रशांत यादव, अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे आणि अधिवक्ता मोहन डोंगरे यांनी या प्रकरणी जनहित याचिका प्रविष्ट केली जावी, तसेच भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशा भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी कायदेशीर साहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. बजरंग दलाचे श्री. नितीन महाजन, पतित पावन संघटनेचे श्री. अक्षय राऊत, श्री. अमित खजिने, शिवसमर्थ कोकण ट्रस्टचे श्री. गणेश पवार, अभाविपचे यश राजीवडेकर, रामभक्त प्रतिष्ठानचे श्री. राकेश शुक्ला आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात