अधिकार माहिती अधिकाराचा सुयोग्य वापर करून शिबिरार्थींचा राष्ट्र आणि धर्म कार्यात सक्रिय होण्याचा निर्धार !
सोलापूर : सामाजिक दुष्प्रवृत्तीच्या विरुद्ध संघटित होऊन वैध मार्गाने कृती करणे हाच सुराज्य स्थापनेचा राजमार्ग आहे. सध्या लाचखोर शासकीय कर्मचारी, तसेच अधिकारी सर्वसामान्य जनतेची अडवणूक करून अन्यायच करत आहेत. अशा वेळी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवून अन्याय निवारण कसे करावे याविषयी शिबिरार्थींना हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी अवगत केले. येथील भावना ऋषी पेठ येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर सोलापूर येथील पद्मशाली संस्था खजिनदार श्री. पुरुषोत्तम उडता आणि उद्योजक श्री. कमटम उपस्थित होते. यामध्ये बजरंग दल, शिवप्रतिष्ठान, पद्मशाली युवक संघटना अशा विविध संघटनांचे धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
या वेळी माहिती अधिकार कायदा २००५ याचा वापर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अपप्रवृत्तींच्या विरोधात संघटित होऊन कायदेशीर लढा देण्यासाठी कसे सहभागी होऊ शकतो, याविषयी अनेकांनी जिज्ञासेने जाणून घेतले. या वेळी ४० धर्मप्रेमी उपस्थित होते. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. अंबादास गोरंटला, शहर संयोजक दीपक पवार, शहर संयोजक प्रमोद यलगीर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रवी गोणे, उद्योजक सत्यनारायण गुर्रम, विवेक इंगळे, समर्थ मोठे, चिदंबर कारकल, मार्कंडेय जनजागृतीचे नीतीन मार्गम, नागेश माहामुनी, सिद्धू चरकुपल्ली, प्रभुलिंग पुजारी, हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ, दत्तात्रय पिसे, रमेश पांढरे, सतीश कुंचपोर आदी उपस्थित होते. या वेळी ‘साधनेचे जीवनातील महत्त्व’ या विषयावर रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. शिबिरार्थींनी माहिती अधिकाराचा सुयोग्य वापर करून राष्ट्र आणि धर्म कार्यात सक्रिय होण्याचा निर्धार केला.
२. कार्यशाळेमध्ये शिबिरार्थींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. काहींनी ‘आम्हाला अनमोल माहिती मिळाली’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात