शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचारापासून वाचवा मोहीम !
पुणे : किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या बांधकामात जवळपास दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आणि दुरुस्तीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, जनतेचे पैसे स्वतःच्या घशात घालणार्या आधुनिक बकासुरांकडून सव्याज वसूल करावेत आणि किल्ल्याचे संवर्धनाचे काम प्रामाणिक कंत्राटदारांकडून करवून घ्यावे, या मागण्यांसाठी १७ सप्टेंबर या दिवशी जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. किल्ले सिंहगडाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी वज्रमूठ बांधलेल्या मावळ्यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचा आणि मागण्यांची पूर्तता होईपर्यंत हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा निर्धार केला. या वेळी १७५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. श्री. प्रवीण नाईक यांनी या वेळी सिंहगडाच्या बांधकाम दुरुस्तीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती दिली.
भ्रष्टाचार निपटून काढणारच ! – अधिवक्ता मोहनराव डोंगरे
गडाच्या डागडुजीत भ्रष्टाचार करून शासन-प्रशासनाने सामान्य जनतेला चुना लावण्याचे काम केले. अशा लोकांची जागा कारागृहाच्या गजाआड आहे. या भ्रटाचाराच्या विरोधात शिवप्रेमी संघटित झाले आहेत. हा भ्रष्टाचार आम्ही निपटून काढणारच !
राष्ट्राचे प्रतीक असणार्या गडकिल्ल्यांच्या डागडुजीत भ्रष्टाचार हा घोर अपराध ! – अधिवक्ता प्रशांत यादव
गडकिल्ले हे राष्ट्राचे प्रतीक आहेत. अशा राष्ट्रीय प्रतिकांच्या कामामध्ये भ्रष्टाचार होणे म्हणजे शौर्य काळवंडण्याचा भाग आहे. ज्या गडांवर मावळ्यांनी आपले रक्त सांडले, त्या खडकांचा आपल्याला अभिमान नाही का ?
औरंगजेब ज्याला धजावला नाही, तो भ्रष्टाचार अधिकारी करत आहेत ! – महेश पवळे, राजे शिवराय प्रतिष्ठान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेब ज्याला धजावला नाही, ते सध्याचे अधिकारी करत आहेत. गडकिल्ल्यांच्या संदर्भात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही.
भ्रष्टाचाराचा विषय मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवणार ! – श्रमिक गोजमगुंडे, सह्याद्री प्रतिष्ठान
गडकिल्ले हे आपले वैभव आहे. ते टिकवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सरकारच्या दुर्ग संवर्धन समितीचा सदस्य म्हणून हे भ्रष्टाचाराचे प्रकरण मी मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवीन.
निलंबन नाही, तर दोषी अधिकार्यांकडून सव्याज वसुली करा ! – श्रीकांत धुमाळ महाराज, जागो ग्राहक जागो – भारत सरकार संघटना
केवळ भ्रष्ट अधिकार्यांचे निलंबन करून चालणार नाही, तर त्यांच्याकडून चांगले काम करून घेऊन दोषी अधिकार्यांकडून सव्याज वसुली करायला हवी. जर सरकारने या प्रकरणी कारवाई केली नाही, तर दोषी अधिकार्यांना आम्ही घेराव घालू.
भ्रष्टाचार सहन करणार नाही ! – अभिजीत बोराटे, हिंदवी स्वराज्य युवा संघटना
पालकमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून दोषी अधिकार्यांवर कारवाई करायला हवी. सर्व गडकिल्ले हे शिवप्रेमींसाठी आस्थेचे आणि प्रेरणा स्थान आहे. त्या संदर्भात झालेला भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही.
… अन्यथा वर्ष २०१९ च्या निवडणुकीत किंमत मोजावी लागेल ! – शंभू गवारे
गडकिल्ल्यांचे संवर्धन नियमांनुसारच केले जावे. या प्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई होणे अपेक्षित आहे; अन्यथा या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल आणि वर्ष २०१९ च्या निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागेल.
कंत्राटे देण्यापूर्वी संबंधितांची शिवचरित्रावर परीक्षा घ्या ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठीच्या आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. शिवप्रेमींच्या सर्व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत हे अंदोलन चालूच ठेवले जाईल. असा भ्रष्ट कारभार पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने कंत्राटे देण्यापूर्वी संबंधितांची शिवचरित्रावर परीक्षा घ्यावी. त्यात उत्तीर्ण होणार्यांना आणि देशाच्या ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान असणार्यांनाच कंत्राटे द्यावीत.
जोपर्यंत हे प्रकरण तडीस जात नाही, तोपर्यंत भ्रष्ट अधिकार्यांना गडावर पाय ठेवू देणार नाही ! – विक्रम बर्गे, राजे शिवराय प्रतिष्ठान
पुरातत्व खात्याकडे गडकिल्ल्यांचे दायित्व असतांना ते नीट न निभावल्याने भ्रष्टाचार होणे, म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार आहे. – अधिवक्ता नीलेश निढाळकर
महाराष्ट्र एस्.टी. कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. देवानंद गरुड, श्री. मिलिंद बोराळकर, श्री. संजय मुंडे, प्रखर धर्मप्रेमी श्री. ऋषिकेश कुलकर्णी, योग वेदांत सेवा समितीचे श्री. उत्कर्ष शर्मा हे मान्यवरही आंदोलनाला उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. येणारे-जाणारे अनेक जण आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
२. आंदोलनाचे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले . हे प्रक्षेपण १४ सहस्र जणांपर्यंत पोहोचले आणि या पोस्टला ३६०४ जणांनी पाहिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात