मेलबर्न / नवी देहली : ऑस्ट्रेलियामध्ये ‘मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या एका विज्ञापनामध्ये श्री गणेश कोकराचे मटण खात असल्याचे दाखवले होते. या विरोधात हिंदूंनी ऑस्ट्रेलियातील ‘अॅडव्हर्टायझिंग स्टँडडर्स ब्यूरो’कडे (एएएसबी कडे) तक्रार करून विज्ञापनावर बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र या ब्यूरोने ही मागणी फेटाळली आहे. ‘या विज्ञापनामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही’, असे ब्यूरोने म्हटले आहे. या विज्ञापनामध्ये गणपतीसह येशू, बुद्ध आदींना दाखवण्यात आले आहे. या विज्ञापनाचा ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासाकडूनही विरोध करण्यात आला होता. ‘आता भारत सरकारनेच ऑस्ट्रेलियावर हे विज्ञापन बंद करण्यासाठी दबाव आणला पाहिजे’, असे हिंदूंचे म्हणणे आहे.
१. एएएसबीचे म्हणणे आहे की, या विज्ञापनामध्ये एकही पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवलेले नाही. एकाही पात्राने दुसर्याचा अपमान करणारे कृत्य किंवा शब्द उच्चारलेले नाहीत. निंदा केली नाही किंवा खिल्लीही उडवलेली नाही. विज्ञापनामध्ये कोणत्याही धार्मिक आचारसंहितेचे उल्लंघन झालेले दिसत नाही.
२. आस्थापनाने म्हटले आहे की, हिंदु धर्मात मांसावर बंदी असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. (हिंदु धर्माने कशावर बंदी घातली आहे आणि कशावर नाही, हे मांसाची विक्री करणार्या परदेशी आस्थापनांनी हिंदूंना शिकवू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हिंदु धर्मात परंपरेनुसार केवळ गोमांस खाल्ले जात नाही. आम्ही हेही सांगू इच्छितो की, विज्ञापनामध्ये गणपतीला मांस खातांना किंवा मद्यपान करतांना दाखवलेले नाही. (हा हिंदूंवर उपकार केला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) विशेष म्हणजे विज्ञापनामध्ये श्री गणेशाच्या वेशात असलेली व्यक्ती ही हिंदू आहे. (हा दावा खरा असेल, तर हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात