हिंदु जनजागृती समितीच्या १५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने !
१. समितीच्या प्रत्येक उपक्रमाला साधनेचा पाया आहे. प्रत्येक कार्यकर्ता स्वत:ची साधना म्हणून हिंदुत्वाचे कार्य करत आहे. त्यामुळे कार्यास ईश्वराचे अधिष्ठान प्राप्त होते आणि कार्याला खर्या अर्थाने यश लाभते, याची प्रचीती आज हिंदु जनजागृती समितीच्या प्रचंड वेगाने वाढणार्या कार्याकडे पाहून लक्षात येते. या माध्यमातून सांप्रतकाळी समितीने ‘धर्मनिष्ठ हिंदुत्वा’च्या नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे.
२. व्यापक हिंदूसंघटनाचे ध्येय उराशी बाळगून देशभरातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांना समवेत घेऊन हिंदु जनजागृती समितीने ६ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचे यशस्वी आयोजन केले. अशा प्रकारे ‘संघटनांचे संघटन’ हा एक नवा आणि अनोखा अध्याय हिंदुत्वाच्या कार्यात समितीने लिहिला आहे.
३. ‘समिती सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मातृ संघटना असल्याचा’ भाव देशातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा झाला आहे.
४. हिंदु देवी-देवतांचा विविध स्तरांवर होणारा अनादर हा धर्मावरील मोठा आघात असल्याचे जाणून देवतांचे विडंबन थांबवण्याची मार्गदर्शक सूत्रे समितीने हिंदूंसमोर ठेवली. नुसती मांडलीच नाहीत, तर अनेक प्रकरणांमध्ये नेतृत्व घेऊन देवतांचे विडंबन थांबवण्यात समितीला यशही आले.
५. सनदशीर मार्गाने, लोकशाहीतील म्हणजेच न्याय-व्यवस्थेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करूनच समितीचा प्रत्येक उपक्रम पार पाडण्यात येतो.
६. धर्महानी रोखणे आणि धर्मविरोधी विचारांचे वैचारिक खंडन करणे, हीसुद्धा धर्मसेवाच आहे, हा नवा विचार हिंदु जनजागृती समितीने रुजवला. नाटकांतून होणारी देवतांची टिंगलटवाळी, हिंदु धर्मातील विविध सण, उत्सव आणि विधी यांच्या विरोधात साम्यवादी, पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्षतावाले यांच्याकडून होणार्या विरोधाला हिंदु जनजागृती समितीने वाचा फोडली.
७. आज राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तवाहिन्यांवर समितीचे अनेक प्रवक्ता हिंदुत्व, हिंदु धर्म आणि हिंदूंची बाजू प्रभावीपणे अन् कौशल्याने मांडत आहेत. अनेक वृत्तवाहिन्या आज समितीच्या प्रवक्त्यांना विविधांगी विषयांवर आयोजित चर्चासत्रांमध्ये हिंदुत्वाची बाजू मांडण्यासाठी निमंत्रित करतात. ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’मध्ये हिंदु धर्माची बाजू मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे नाव आज अग्रक्रमाने घेण्यात येते, हे अधोरेखित करण्यासारखे सूत्र ! हेच हिंदु जनजागृती समितीचे निराळेपण आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात