मेक्सिको सिटी : दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशाची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटी शहराला २० सप्टेंबर या दिवशी ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात २२६ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेक्सिकोतील रोबोसो या शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली. अनेक घरे कोसळली. घर आणि इमारती यांच्या ढिगार्याखाली अनेक जण दबले गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते, असे म्हटले जात आहे. बचाव पथकाकडून ढिगार्यांखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. मेक्सिको सिटी विमानतळावरील विमानांचे उड्डाण रोखण्यात आले आहे. यापूर्वी वर्ष १९८५ मध्ये मेक्सिकोला भूकंपाचा धक्का बसला होता. त्या वेळी अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.
या शहराची लोकसंख्या सुमारे २ कोटी आहे. शहराचे महापौर मिग्वेल एंजल यांनी सांगितले की, शहरात ४४ ठिकाणी इमारती ढासळल्याचे वृत्त आहे. १९८५ नंतरचा हा सर्वात मोठा भूकंप आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून या भूकंपाची माहिती देत नागरिकांना दिलासा दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात