नोएडा (उत्तरप्रदेश) : देहलीला लागून असणार्या ग्रेटर नोएडा शहरामध्ये नवरात्रीत मांस अन् अंडी यांची दुकाने बंद ठेवण्याची आणि मशिदींवरील भोंगे बंद ठेवण्याची मागणी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. ग्रेटर नोएडाच्या २ मंदिरांच्या महंतांनीही प्रशासनाकडे अशा प्रकारची मागणी केली आहे. गोरक्षा हिंदु दलाच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाला चेतावणीही दिली आहे की, जर कोठे मांस आणि अंडी यांची विक्री करणारी दुकाने उघडी दिसली, तर दलाचे कार्यकर्ते ही दुकाने बंद करतील. गोरक्षा हिंदू दलाने कावडयात्रेच्या वेळी मांसाची दुकाने बंद केली होती.
१. गोरक्षा हिंदू दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विश्व हिंदु महासंघाचे प्रदेशमंत्री वेद नागर यांनी म्हटले की, आम्ही जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून वरील मागण्या केल्या आहेत. यापूर्वीच्या अखिलेश यादव सरकारच्या काळात रमझानच्या मासात अनेक मंदिरांवरील भोंगे बंद ठेवण्यात आले होते. (अखिलेश यादव यांचा निधर्मीवाद ! हिंदूंवर अन्याय करून अन्य धर्मियांना सुविधा पुरवणार्यांचा हा निधर्मीवादी संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अशा वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळी मशिदीचे भोंगे बंद ठेवले पाहिजेत.
२. गौतमबुद्धनगरचे जिल्हाधिकारी म्हणाले की, गोरक्षा हिंदू दलाकडून आमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. ते आमच्याकडे आले, तर आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ; मात्र त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई केली जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात