गुरुग्राम (हरियाणा) : येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मांसविक्री करणार्या ५०० दुकानांवर कारवाई करत त्यांना टाळे ठोकले आहे. त्यांनी सूरतनगर, अशोक विहार, सेक्टर क्रमांक ५ आणि ९, पटौदी चौक, सदर बाजार, खांडसा धान्यबाजार, बस स्टॅण्ड, डीएल्एफ्, सोहना आणि सेक्टर १४ मधील मांसविक्रीची दुकाने बंद केली. शिवसेना कार्यकर्त्यांनी हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ मिळणार्या दुकानांना नोटीस पाठवत नवरात्र संपत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेशच दिला आहे.
शिवसेनेच्या गुरुग्रामचे सरचिटणीस आणि प्रवक्ता ऋतूराज यांनी सांगितले की, आम्ही मांस आणि चिकन यांची दुकाने बंद व्हावीत यासाठी आधीच नोटीस बजावली होती. आम्ही १९ सप्टेंबरला गुरुग्रामचे उपायुक्त विनय प्रताप सिंह यांना अर्ज देत पुढील ९ दिवस मांसविक्री करणारी दुकाने बंद करण्याची मागणी केली होती; मात्र प्रशासनाने ही दुकाने बंद ठेवण्याचा कोणताच आदेश दिला नाही. गुरुग्राममधील ५० टक्के दुकाने आधीच बंद होती आणि जी चालू होती ती आम्ही बंद करायला लावली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, आम्ही प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. कोणालाही कायदा हातात घेण्याचा हक्क नाही. जर शिवसेना कार्यकर्त्यांनी बळजोरीने दुकाने बंद केली, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. याप्रकरणी तक्रार दाखल होण्याची वाट आम्ही पहात आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात