सांगली : भारतीय परंपरा ही अत्यंत प्राचीन आहे. ही परंपरा धार्मिक, सांस्कृतिक असून ती उदात्त आहे. नवरात्रीच्या काळात प्रत्येक कुटुंबात नवरात्र करतात आणि देवीकडे आशीर्वाद मागतात. जसे आपले व्यक्तीगत कुटुंब आहे, तसे भारतमातेचेही कुटुंब आहे. या भारतमातेच्या संसारावर अनादी काळापासून संकटे येत आहेत. अनेक शत्रू त्यावर टपून बसले आहेत. त्यामुळे या शत्रूंचा नायनाट होऊन भारतमातेचा संसार सुरक्षित आणि बलवान होण्यासाठी आपण सर्वजण श्रीदुर्गादेवीकडे साकडे घालूया, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने चालू झालेल्या श्रीदुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवशी ते माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्रीदुर्गामाता मंदिरासमोर बोलत होते.
गुरुजींच्या मार्गदर्शनानंतर शहरातील विविध भागात जाऊन शिवतीर्थावर दौडीची समाप्ती झाली. दौडीत धारकरी देशप्रेम, धर्मप्रेम उत्पन्न करणारी गीते म्हणत होती. सर्वांत अग्रभागी असलेला भगवा ध्वज झोपलेल्या हिंदूंमधील क्षात्रतेज जागृत करत होता. या वेळी भाजप आमदार श्री. सुधीर (दादा) गाडगीळ यांसह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात