पुणे : सत्य इतिहास सर्वांसमोर मांडायला हवा. दुर्दैवाने भारतात पराजयाचा इतिहास शिकवला जातो. ज्यांनी हिंदूंना, देशाला लुटले असे अकबर, अलेक्झांडर यांचा ‘द ग्रेट’ असा उल्लेख केला जातो. खरे तर भारतात अनेक ऐतिहासिक स्थाने, मंदिरे आहेत. अशा सर्वांचा अन् हिंदूंच्या विजयाचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहायला हवा, असे प्रतिपादन इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. गिरीश ठक्कर यांनी केले.
१८ सप्टेंबर या दिवशी येथील भारत इतिहास संशोधक मंडळात ‘सोमनाथ मंदिर – संघर्षाची कहाणी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून सोमनाथ मंदिराचे ऐतिहासिक, आध्यात्मिक, भौगोलिक महत्त्व विषद केले.
श्री. ठक्कर यांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलेली सूत्रे
१. सोमनाथ हे प्राचीन काळी समृद्ध बंदर होते. त्या ठिकाणी समुद्रमार्गे व्यापार चालत असे. धनसंपत्तीने भरलेली विश्वभरातील जहाजे त्या ठिकाणी येत असत.
२. ऋग्वेद, स्कंधपुराण, महाभारत, पाणिनीचे व्याकरण आदी ग्रंथांमध्ये सोमनाथ क्षेत्राचे वर्णन आहे.
३. प्रतिदिन लाखो भाविक त्या ठिकाणी येऊन सोमनाथाचे दर्शन घेत आणि अर्पण करत.
४. त्या काळातील भारतवर्षाचा एक नवमांश भाग म्हणजे सौराष्ट्र आणि सौराष्ट्राचा एक नवमांश भाग म्हणजे सोमनाथाचे प्रभासक्षेत्र होते. महाभारतातील युद्धपर्व, कृष्णलीला याच प्रभासक्षेत्री झाली.
५. अनुमाने ७ कोटी ९९ लाख २५ सहस्र वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिराचे निर्माण झाले असावे.
६. सोमनाथक्षेत्री गंगा, यमुना आणि प्राची सरस्वती (पूर्वेकडे वहाणारी) या नद्यांचा संगम असल्याचा उल्लेख आहे. आजही तेथे त्रिवेणी संगम आहे.
७. सोमनाथ येथे अथांग संपत्ती आणि वैभव असल्याने ती लूटण्यासाठी आक्रमक यायचे.
८. महंमद गझनीने १७ वेळा सोमनाथवर आक्रमण केले. मंदिरे भ्रष्ट केली. मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा पूर्वीइतकेच वैभवशाली मंदिराचे निर्माण केले जायचे. या १७ आक्रमणांपैकी ३ वेळा गझनीचा पराभवही झाला आहे. मंदिराचे मशिदीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
९. परमश्रद्धेय असलेल्या धार्मिक स्थानावर आक्रमण करण्याचा परिणाम म्हणून ‘हर हर महादेव’ हा पुढे युद्धघोष बनला.
१०. या मंदिराचे पुनर्निमाण करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न होते. त्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात निधीची सोय करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा घेतला; मात्र गांधीनी त्याला विरोध केला.
११. सोमनाथ क्षेत्र हे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक उर्जेचे स्थान आहे. त्या ठिकाणी एक प्रकारची अद्भुत उर्जा आहे, जी मंदिर अनेक वेळा उद्ध्वस्त होऊनही अद्याप प्रकट होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात