Menu Close

हडपसर (पुणे) : ‘व्हॅलेंटाइन डे’ पार्टीनंतर तरुणीवर बलात्कार

हडपसर (पुणे) : ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने फ्लॅटमध्ये आयोजित केलेल्या पार्टीनंतर झोपलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी पहाटे अमनोरा पार्क परिसरातील सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणी संबधीत तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिरोज महंमद शेख (वय २२) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या तीन मैत्रिणींसह अमनोरा पार्क परिसरातील एका उच्च वर्ग सोसायटीत राहते. पीडित तरुणी व तिच्या मैत्रिणी यांनी मगरपट्टा परिसरातील एक जिम जॉइन केली होती. त्या जिममधील प्रशिक्षक आणि त्याचा मित्र शेख या दोघांची या तरुणींशी ओळख झाली. याच ओळखीतून त्यांनी ‘व्हॅलेनटाईन डे’ च्या दिवशी पार्टी करण्याचे ठरविले. त्यानुसार शनिवारी रात्री जिम प्रशिक्षक आणि त्याचा मित्र शेख तरुणींच्या फ्लॅटवर आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची पार्टी सुरू होती. पार्टी संपल्यानंतर तीन मुली एका रूममध्ये झोपायला गेल्या. पीडित तरुणी एका रूममध्ये एकटीच झोपली होती.

रात्री उशीर झाल्यामुळे जिम प्रशिक्षक आणि शेख या दोघांनी तरुणींच्या फ्लॅटवर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही हॉलमध्ये झोपले. त्याच वेळी पहाटेच्या सुमारास शेख याने एकट्या झोपलेल्या तरुणीच्या रूममध्ये घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचे संबंधित तरुणीने फिर्यादीत म्हटले. घटनेनंतर तिने तिचा मित्र व मैत्रिणींना माहिती दिली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती देत पोलिस मदतीची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणी मूळची ही कलकत्ता येथील असून तिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती सध्या एका मॉलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते. तिच्या रूममधील दोघी मैत्रिणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, तर एक तरुणी आयटी कंपनीत कामाला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. माळी अधिक तपास करीत आहेत.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *