आर्य-वैश्य समुदायाच्या विरोधात पुस्तकातून लिखाण
धार्मिक भावना दुखावणार्यांच्या विरोधात पोलीस, प्रशासन आणि सरकार त्वरित कारवाई करत नसल्यामुळे जनता कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करते, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी सरकार जागे होईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
भूपलपल्ली (तेलंगण) : लेखक कांचा इलय्या यांच्या ‘सामाजिका स्मगलर्लु कोमाटोल्लू’ या तेलुगु पुस्तकामध्ये आर्य-वैश्य समुदायाच्या विरोधात विधाने करण्यात आल्याने त्यांचा तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणच्या वारंगल जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी कांचा इलय्या आले असतांना त्यांना चपलांनी मारण्याची घटना घडली. त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कांचा इलय्या यांना पोलीस ठाण्यात नेले; मात्र त्यानंतरही तणाव कायम होता. दुसरीकडे सईदाबाद पोलीस ठाण्यात कांचा इलय्या यांच्या विरोधात अधिवक्ता करुणासागर यांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अधिवक्ता करुणासागर यांचा आरोप आहे की, कांचा इलय्या यांच्या ४ पुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यात देवतांचा अवमान करण्यात आला आहे. ‘म. गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे हेही ब्राह्मण होते’, अशा प्रकारचे वाक्य लिहिण्यात आले आहे. यातून जातीय तेढ निर्माण करण्यात आले आहे.
यापूर्वी तेलगु देसम पक्षाचे खासदार व्यंकटेश यांनीही टीका केली आहे. ‘आर्य- वैश्य समुदाय पूर्वी मांसाहार करत होता’, असेही कांचा इलय्या यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे’, असे व्यंकटेश यांनी म्हटले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात