घोटाळेबाजांची तत्परतेने चौकशी करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण आणि साधना न शिकवल्यामुळेच चैतन्याचा स्रोत असलेल्या मंदिरांसह सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार माजला आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
अमरावती : येथील श्री अंबादेवी संस्थानकडे भूमीसंबंधीची नोंदवही संग्रहित करण्यात न आल्याने भूमीची अद्ययावत माहितीच उपलब्ध नाही. संस्थानची बरीच भूमी विश्वस्तांनी विकली आहे. काही भूमी धरणे किंवा शासकीय प्रकल्प यांत गेली आहे. काही जागांच्या संदर्भात कुळाचे वाद असल्याने प्रकरणे न्यायालयात आहेत.
न्यायालयीन प्रकरणांमध्ये पाठपुरावा करण्यात व्यवस्थापक मंडळ अल्प पडत असून वेळेत कार्यवाही करून मालमत्ता कह्यात घेण्यात विश्वस्त मंडळ उदासीन आहे, असा निष्कर्ष धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला.
चौकशी अहवालात सादर केलेली अन्य सूत्रे
१. मंदिराच्या इमारतींचे आधुनिकीकरण केलेले नाही. मंदिराचा काही भाग जीर्ण अवस्थेत असून तो केव्हाही पडू शकतो.
२. भक्तांकडून जमा झालेला पैसा अन्य बांधकामासाठी वापरण्यात आला. मंदिराला मिळणार्या देणगी, दानातून मंदिराचाच विकास होत नाही. त्यामुळे भक्त असंतुष्ट आहेत. अशा ऐतिहासिक देवस्थानची विकासाची गती अतिशय मंद आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात