जगभरातील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी सर्वप्रथम भारताला हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे, हे हिंदूंना लक्षात येईल तो सुदिन !
नवी देहली : म्यानमारमधील हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये निर्वासित म्हणून रहात असणार्या हिंदूंना आता तेथे रहाण्याविषयीची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे भारत त्यांना साहाय्य करील, अशा आशेवर ते आहेत; मात्र भारताने अद्याप या हिंदूंविषयी कोणतेही विधान केलेले नाही. सध्या सरकार देशातील ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतातून बाहेर पाठवण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील निर्णयाची वाट पहात आहे.
१. बांगलादेशमधील छावण्यांमध्ये रहात असलेले म्यानमारमधील हिंदु निरंजन रूद्र म्हणाले की, भारताला हिंदूंचा देश मानले जाते. आम्ही केवळ भारतात येऊन शांतीपूर्ण जीवन जगू इच्छित आहोत. त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच नको. असे जीवन आम्हाला म्यानमारमध्ये किंवा बांगलादेशमध्ये कधीही मिळणार नाही.
२. विश्व हिंदु परिषदेचे वरिष्ठ सदस्य अचिंत्य बिस्वास म्हणाले की, म्यानमारमधून पलायन केलेल्यांना भारतच अंतिम आशास्थान आहे. केंद्र सरकारने या हिंदूंना भारतात येऊ दिले पाहिजे. ते आणखी कुठे जाणार ?
३. बिस्वास यांनी सांगितले की, विहिंप आणि रा.स्व. संघ केंद्रीय गृहमंत्रालयाला एक अहवाल सादर करणार आहे. त्याद्वारे म्यानमार आणि बांगलादेश येथील हिंदूंना भारतात शरण देण्याच्या संदर्भात धोरण बनवण्याची मागणी करण्यात येईल. (हे अन्य कोणाला का सांगावे लागत आहे ? सरकारला ते का कळत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात