संयुक्त राष्ट्रे : भारताच्या राजदूत पौलोमी त्रिपाठी यांनी काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आलेले लेफ्टनंट उमर फयाझ यांचे छायाचित्र संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दाखवत पाकचा खोटारडेपणा उघड केला. ‘हे छायाचित्र खोटे नाही, तर खरे आहे. हे छायाचित्र म्हणजे पाकच्या आतंकवादाचा तोंडवळा आहे. आतंकवाद्यांनी फयाझ यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली; मात्र पाकचे प्रतिनिधी कधीही यावर प्रकाश टाकणार नाहीत’, असे त्रिपाठी यांनी पाकला सुनावले. संयुक्त राष्ट्रांत पाकच्या प्रतिनिधींनी पॅलेस्टिनी महिलेचे छायाचित्र काश्मीरमधील पीडित म्हणून दाखवले होते. त्यावर भारताने हे प्रत्युत्तर दिले. ‘पाकिस्तान आतंकवादाचे आंतरराष्ट्रीय केंद्र झाले आहे आणि यापासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकचे प्रयत्न चालू आहेत,’ अशा शब्दांमध्ये त्रिपाठी यांनी पाकला खडसावले. भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी पाककडून खोटे छायाचित्र संयुक्त राष्ट्रांत दाखवण्यात आले.
उमर फयाझ यांचे काही मासांपूर्वी आतंकवाद्यांनी अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे कर्तव्य बजावत नसतांना एका लग्न समारंभातून अपहरण करून फयाझ यांची हत्या करण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात