आळसंद येथील शौर्य जागरण शिबिरासाठी १३० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती
आळसंद-विटा (जिल्हा सांगली) : दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. याच्या विरोधात अनेक जण मेणबत्ती मोर्चा, तसेच अन्य मार्गांनी निषेध नोंदवत आहेत; मात्र हे अत्याचार अल्प होत नाहीत. ‘महिलांनी स्वतःच स्वतःचे रक्षण करावे’, असे सांगून पोलिसांनीही त्यांचे दायित्व झटकले आहे. त्यामुळे महिला-युवती यांनीच स्वसंरक्षासाठी सिद्ध होणे ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. शर्वरी रेपाळ यांनी केले. त्या २४ सप्टेंबर या दिवशी आळसंद (तालुका खानापूर, जिल्हा सांगली) येथे श्रीनाथ गणेश आणि श्रीदुर्गामाता उत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित जागरण शिबिरात बोलत होत्या.
या शिबिरासाठी जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १०० युवती-महिला आणि ३० युवक शिबिराला उपस्थित होते. सौ. शर्वरी रेपाळ यांनी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिबिरात सौ. वीणा कदम यांनी सूत्रसंचालन केले. शिबिराच्या शेवटी श्रीनाथ गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि श्रीशिवप्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याविषयी त्यांचे आभार मानण्यात आले.
हिंदूंमधील सुप्त शौर्य जागृत करण्यासाठी या शिबिराचे आयोजन ! – वैद्या (कु.) शिल्पा बर्गे
शिबिराच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीच्या वैद्या (कु.) शिल्पा बर्गे यांनी शिबिराचा उद्देश आणि ‘हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘शौर्य आणि पराक्रम ही आपली परंपरा असतांना ब्रिटीशकालीन कायदे आणि खोट्या अहिंसावादी विचारसरणीच्या प्रभावामुळे हिंदू त्यांच्यातील लढाऊ वृत्ती हरवून बसले आहेत. त्यामुळे आपल्यातील सुप्त शौर्य जागृत करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करावे लागले आहे.’’ कु. वर्षा नकाते यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचे विचार’ या विषयावर मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर एखादे संकट ओढावल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा, तसेच स्वसंरक्षण कसे करावे याची प्रात्यक्षिके करून दाखवली.
२. शिबिरात महिला आणि युवती यांनी उत्स्फूर्तपणे हात उंचावून वीरश्री निर्माण करणार्या घोषणा दिल्या.
३. उपस्थित युवतींनी प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
४. शिबिराच्या कालावधीत पर्जन्यवृष्टी होत असतांनाही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विशेष
१. आळसंद येथील महिला सरपंच सौ. इंदुमती जाधव या सहकुटंब पूर्णवेळ शिबिरासाठी उपस्थित होत्या.
२. शिबिराचा प्रचार करतांना एक कुत्रा धर्मशिक्षण वर्गातील साधकांसमवेत येत होता. तो ज्या ज्या घरी थांबत असे, तेथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे.
शिबिराचे आयोजन धर्मशिक्षणवर्गातील महिला, श्रीनाथ गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते अन् श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन केले होते. (काळाची पावले ओळखत नवरात्रोत्सव कालावधीत अन्य कार्यक्रम न घेता शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करणार्या श्रीनाथ गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांचे अभिनंदन ! यातून प्रेरणा घेऊन अन्यत्रच्या मंडळांनीही असे उपक्रम राबवावेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात