असे धर्मप्रेमी सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सांगली : येथील कॉलेज कॉर्नर परिसरात काही रिक्शाचालकांनी एकत्र येऊन श्री दत्तगुरूंचे मंदिर बांधले आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार २७ सप्टेंबर या दिवशी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक सकाळी १०.३० वाजता हे मंदिर अतिक्रमित आहे म्हणून पाडण्यासाठी फौजफाटा घेऊन उपस्थित झाले. ही गोष्ट शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके यांना समजली. त्यांच्या सहकार्यांसह लगेच ते त्या परिसरात उपस्थित झाले. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या ऐन नवरात्रात होणार्या या कारवाईस श्री. घोडके यांनी तीव्र विरोध केला. यामुळे महापालिकेचे पथक कारवाई न करता परत गेले. (अतिक्रमणाच्या नावाखाली केवळ हिंदूंचीच मंदिरे पाडण्यास विरोध करणारे शिवसेनेचे श्री. मयुर घोडके यांचे अभिनंदन ! शहरात अतिक्रमित असलेलली अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळेही आहेत, तरी महापालिका प्रशासन केवळ हिंदूंच्याच मंदिरांवरच का कारवाई करते ? न्यायालयाचा आदेश असल्यास तो सर्वांसाठी समान लागू करणे अपेक्षित नाही का ? त्याचप्रकारे ऐन नवरात्रात मंदिर पाडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून महापालिका नेमके काय साध्य करत आहे ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे केले असते का ? – संपादक)
मंदिर पाडण्याच्या अगोदर चर्चा करून आपण समन्वयातून मार्ग काढू, तसेच मंदिर पाडण्याच्या अगोदर हेच मंदिर महापालिकेने स्वखर्चाने स्थलांतर करून द्यावे, नंतरच ते तोडण्यात यावे, अशी भूमिका श्री. घोडके यांनी घेतली. शहरात इतक्या ठिकाणी अतिक्रमण वाढलेले असतांना मंदिरांचे अतिक्रमण महापालिकेला का दिसते ? असा प्रश्नही श्री. घोडके यांनी या वेळी उपस्थित केला. महापालिका प्रशासन मंदिराच्या जवळ असणारे आैंदुबराचे झाडही तोडणार आहे, त्यालाही श्री. घोडके यांनी विरोध केला असून भाविकांशी चर्चा करूनच महापालिकेने निर्णय घ्यावा, असे आवाहन श्री. घोडके यांनी केले आहे.
काही महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने याचप्रकारे बसस्थानक परिसरात असलेले श्री दत्तगुरूंचे मंदिर अतिक्रमणाच्या नावाखाली सकाळी ७ वाजता मोठा पोलीस फाटा घेऊन पाडले होते. हे मंदिरही त्या परिसरात असलेल्या रिक्शाचालकांनी बांधले होते आणि परिसरातील भाविकांचे ते श्रद्धास्थान होते. राममंदिर परिसरात असलेले अत्यंत जुने असे श्री नागदेवतेचे मंदिरही महापालिका प्रशासन पाडणार होते; मात्र परिसरातील भाविकांच्या तीव्र विरोधामुळे महापालिकेला हा निर्णय स्थगित करावा लागला होता. महापालिका प्रशासन केवळ हिंदूंच्याच मंदिरांवर कारवाई करत असल्याविषयी हिंदु भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांमध्ये अप्रसन्नता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात