उठ भगिनी जागी हो ! दुर्गा, चंडी, गार्गी हो !…चा नाटिकेतून जागर !
सोलापूर : हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान जागृत व्हावा आणि लव्ह जिहाद, धर्मांतर, महिलांची छेडछाड, अतिप्रसंग, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आदी समस्यांना बळी पडत असलेल्या हिंदु महिलांना वाचवण्यासाठी, तसेच त्यांच्यातील स्त्री शक्ती जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु तेजा जाग रे ही नाटिका नवरात्रोत्सवानिमित्त सोलापूर शहर आणि परिसरातील ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सादर करण्यात येत आहे. या नाटिकेमध्ये सिद्धेश्वर विटकर, सतीश कुंचपोर, यशपाल वाडकर, रमेश पांढरे, लक्ष्मण साळुंखे, कु. कोमल रगडे आदी कार्यकर्ते सहभागी आहेत.
महिलांवरील वाढते अत्याचार, हिंसाचार आदी समस्यांवर स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भरतेने अशा प्रसंगाचा यशस्वीरित्या सामना करणे हाच उपाय आहे. निर्भया, कोपर्डी आदी ठिकाणच्या दुर्दैवी प्रसंगांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता महिलांनी स्वत: स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वत:चे आणि पर्यायाने इतरांचे रक्षण करायला हवे, असा संदेश या नाटिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
फटाक्यांच्या माध्यमातून हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे होणारे विडंबन, फटाकेमुक्त आदर्श दिवाळी साजरी करण्याचे महत्त्व, रोहिंग्या मुसलमानांचे भारतासमोर असलेले आव्हान आदी सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवरही या नाटिकेच्या माध्यमातून व्यापक प्रबोधन आणि जागृती करण्यात येत आहे. या नाटिकेस महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभत आहे.
क्षणचित्रे
१. अनेक नवरात्रोत्सव मंडळांनी गणेशोत्सवातच या नाटिकेची मागणी केली होती.
२. अन्य नवरात्रोत्सव मंडळांकडून नाटिका दाखवण्याची मागणी येत आहे.
३. नाटिका पाहिल्यानंतर महिलांनी प्रशिक्षणवर्गाची मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात