सोमवती अमावास्येच्या निमित्ताने हरियाणातील पांडू पिंडारा आणि उज्जैन येथील रामघाट परिसर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आचारधर्म, तसेच राष्ट्ररक्षण यांविषयी माहिती देणार्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
पांडू पिंडारा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाचे आयोजन
हरियाणा : पांडू पिंडारा (जिन्द) येथे प्रत्येक सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंड दान करण्यासाठी लक्षावधी भाविक येतात. या निमित्ताने ८ फेब्रुवारी या दिवशी पांडू पिंडारा येथील रतिराम आश्रमाचे व्यवस्थापक महंत केशवानंद महाराज यांनी त्यांच्या आश्रमात सनातनचे ग्रंथ आणि फलकांचे प्रदर्शन लावण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना निमंत्रित केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाचा लाभ शेकडो जिज्ञासूंनी घेतला.
या आश्रमाच्या वतीने श्री रतिराम संस्कृत महाविद्यालयही चालवण्यात येते. येथे अनेक आश्रम बनवण्यात आले आहेत.
उज्जैन येथे सनातन संस्थेच्या आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फलक प्रदर्शनाचे आयोजन
उज्जैन : सोमवती अमावस्येच्या निमित्ताने रामघाट परिसर येथे सनातन संस्थेच्या आणि हिंदु जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने आचारधर्म, तसेच राष्ट्ररक्षणाविषयी माहिती देणार्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शन लावण्यासाठी श्रीक्षेत्र पंडा समितीचे उपाध्यक्ष पं. संजय जोशी यांनी अनुमती दिली.
पांडू पिंडारा या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य
पांडवांच्या काळापासून या स्थळाला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले. त्या वेळी जिंद गावाला जयंती नगरी असे नाव होते. सत्ययुगात चंद्र क्षयरोगाने ग्रासला होता. या पवित्र तीर्थामध्ये स्नान केल्यावर त्याचा क्षयरोग दूर झाला. चंद्राचे नाव सोम असल्याने सत्ययुगात हे तीर्थ सोमतीर्थ या नावाने ओळखले जात होते. पुढे द्वापरयुगात ते पिंडारक या नावाने प्रसिद्ध झाले. महाभारताच्या युद्धात सर्व कौरव आणि त्यांचे मित्र मारले गेल्याने त्यांच्या पत्नी विधवा झाल्या. युद्धानंतर एक वर्षांने धर्मराजा युधिष्ठिराने राजगादीवर बसतांना आपल्या मृत नातेवाईकांसाठी आणि त्यांच्या दु:खी आणि संतप्त विधवांच्या कल्याणार्थ शरपंजरीवर झोपलेल्या भीष्मांना प्रश्न विचारला की आमच्या पितरांना मोक्ष कसा मिळेल ? तेव्हा पितामह भीष्म यांनी पिंडारा तीर्थावर जाऊन स्नान करून दान आणि पिंडदान करण्यास सांगितले. येथे पिंडदान करण्याने या तीर्थाचे नाव पांडू पिंडारा असे प्रचलित झाले.
पांडवांनी १२ वर्षे या तपोवनात तपश्चर्या केली आणि आपल्या पितरांना मोक्ष मिळावा यासाठी स्नान, तर्पण आणि पिंडदान केले. एवढे करूनही सोमवती अमावस्या आली नाही. शेवटी कलियुगामध्ये सोमवती अमावस्या सारखी-सारखी येत राहील, असा शाप देऊन पांडव तेथून निघन गेले. या तीर्थाचे खोदकाम करतांना मिळालेल्या दिव्य शिवलिंग मूर्तीची स्थापना पांडवांनी केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात