श्रीदुर्गामाता दौडीचा समारोप !
सांगली : माणसे केवळ राष्ट्रात रहातात म्हणून राष्ट्रभक्त होऊ शकत नाही. ज्याला देव, देश, धर्म यांविषयी काहीच ठाऊक नाही. केवळ मरेपर्यंत जगायचे त्यांना राष्ट्रीय म्हणायचे का ? त्यांना राष्ट्रभक्त बनवण्यासाठी श्रीदुर्गादौड आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे राष्ट्राचा तीव्र अभिमान आणि अन्यायाची तीव्र जाणीव होय, असे मार्गदर्शन श्रीशिप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. ते ३० सप्टेंबर या दिवशी श्रीशिवतीर्थासमोर श्रीदुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या वेळी धारकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) पुढे म्हणाले, जगातील १८७ राष्ट्रांपैकी ७६ राष्ट्रांनी आपल्यावर वेळोवेळी आक्रमण केले आहे; मात्र समाजात हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व नसल्यामुळे त्यांचा सामना आपण करू शकलो नाही. असा समाज जिवंत असून मृतवत आहे. मतदानाचे राजकारण करून मूळ देशभक्तीचा सुगंध त्यांच्यात निर्माण करण्याचे सामर्थ्य राजकारण्यांमध्ये नाही. ईश्वरच असे सामर्थ्य निर्माण करू शकतो. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपात ईश्वर निर्माण झाला. दौड म्हणजे मौजमजा नाही, तर शिवाजी-संभाजी यांसारखा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. यासाठी प्रत्येकाच्या घरात रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ असलेच पाहिजे आणि त्यांचे वाचन झालेच पाहिजे. हे सीमोल्लंघन प्रत्येक घरातघरात करून प्रत्येकात राष्ट्रीयत्व निर्माण करूया !
क्षणचित्रे
१. दौडीत अग्रभागी असलेला भगवा ध्वज, भगवे फेटे, धारकर्यांचा अपूर्व उत्साह यांमुळे वातावरण भगवेमय-हिंदुत्वमय झाले होते.
२. या वेळी महिलाही उपस्थित होत्या.
पुढील गडकोट मोहीम प्रतापगड ते रायरेश्वर !
युवकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम जागृत व्हावे, त्यांना गडकोटांविषयी आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रतीवर्षी गडकोट मोहिमांचे आयोजन केले जाते. यंदाची मोहीम प्रतापगड ते रायरेश्वर अशी होईल, असे पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यानी यावेळी घोषित केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात