देहली येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा
देहली : आगामी काळात जगात हिंदु राष्ट्र किंवा इस्लामी राष्ट्र, असे दोनच पर्याय असणार आहेत. त्यामुळे आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनून भारत तथा हिंदु धर्माचे रक्षण करणे, हीच काळानुसार साधना आहे. याकरता आम्ही साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील वसंत कुंजमधील श्रीकृष्ण धाम मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २ दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक निवासी कार्यशाळे’त ते बोलत होते. या कार्यशाळेस देहली, गुरुग्राम, नोएडा, अलीगड आणि फरिदाबाद येथील धर्मप्रेमींनी सहभाग घेतला. या प्रसंगी उपस्थित असलेले हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ आणि ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयांवर मार्गदर्शन केले. समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.
या कार्यशाळेत उपस्थित धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या मनोगतात ‘या कार्यशाळेमुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. धर्म वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ? हिंदुत्वाचा प्रसार कसा करायचा ? आदी शिकायला मिळाले. या समवेतच हिंदु राष्ट्राची संकल्पना स्पष्ट झाली, तसेच साधना समजून ईश्वरावरील श्रद्धा वाढण्यासही साहाय्य झाले’, असे सांगितले.
क्षणचित्रे
१. कार्यशाळेत भगवान श्रीकृष्णाची मानसपूजा घेण्यात आली. त्यामुळे अनेक धर्मप्रेमींना ईश्वरी अस्तित्वाच्या अनुभूती आल्या.
२. कार्यशाळेच्या दुसर्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप करण्यात आला.
३. कार्यशाळेचा समारोप झाल्यानंतर नोएडा येथील धर्मप्रेमी श्री. दीपक दुबे आणि श्री. मुकेश कुमार यांनी स्वत:हून कार्यशाळा संपल्यानंतर कार्यस्थळी असलेले साहित्य आवरण्याची सेवा केली. त्यांना साधकांचा सेवाभाव पाहून अतिशय आनंद मिळाला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात