Menu Close

‘सनबर्न’ला भारतातूनच हद्दपार करा ! – सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

पिंपरी-चिंचवड येथे ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजनाचे प्रकरण

डावीकडून श्री. चंद्रकांत वारघडे, पू. सुनील चिंचोलकर, ह.भ.प. श्याम महाराज राठोड, श्री. पराग गोखले (बोलतांना) आणि श्री. प्रवीण नाईक

पुणे : व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारा आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा पूर्वेतिहास असलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पिंपरी चिंचवड भागातील मोशी गावात होणार आहे. वर्ष २०१६ मध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि पुणेकर यांचा विरोध डावलून या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. या वर्षीही त्याच प्रकारची पुनरावृत्ती होत आहे. गोव्यातून हाकलवून लावलेला हा फेस्टिव्हल पुण्यातूनच नव्हे, तर भारतातूनच हद्दपार व्हायला हवा, अशी एकमुखी मागणी समस्त सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुण्याच्या गांजवे चौकातील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. श्याम महाराज राठोड, माहिती सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, सनातन संस्थेचे

श्री. प्रवीण नाईक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले उपस्थित होते.

प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ची पार्श्‍वभूमी सांगितली. ते म्हणाले, ‘‘गोव्यात झालेल्या ‘सनबर्न’मध्ये नेहा बहुगुणा या तरुणीचा अमली पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू झाला. त्यानंतर कर बुडवल्याने गोवा शासनाने या फेस्टिव्हलला तिथून हाकलून दिले. मागील वर्षी परम पवित्र अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या परिसरात या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. आता पुण्यभूमी असलेल्या देहु-आळंदी परिसरातील मोशी गावात त्याचे आयोजन होत आहे. अशाप्रकारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करून त्यांना मोडीत काढण्याचा या फेस्टिव्हलचा डाव आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात आधीच चिंबळीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव केला आहे. अन्य गावांतील ग्रामस्थही लवकरच ठराव करतील.’’

मोशी गावात सनबर्न ही ज्ञानदेव-तुकाराम महाराज यांची विटंबना ! – पू. सुनील चिंचोलकर

देहू-आळंदी मार्गावर शेकडो वर्षे लाखो वारकरी ज्ञानदेव-तुकारामांच्या गजरात मांगल्याचा वर्षाव करत असतात. या मार्गावरील मोशी गावात ‘सनबर्न फेस्टिव्हल’ करणे म्हणजे संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम महाराज यांची विटंबनाच आहे. सनबर्न म्हणजे स्त्रियांच्या शिलाच्या खरेदी-विक्रीचे विकृत माध्यम आहे. जर हा कार्यक्रम मोशीत झाला, तर शिवसेना-भाजप शासनाची ती मृत्यूघंटा ठरेल. सनबर्न कार्यक्रम घ्यायचा असेल, तर आमचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही, असे शासनाने प्रामाणिकपणे घोषित करावे.

संतांच्या भूमीत सनबर्न होऊ देणार नाही ! – ह.भ.प. श्याम महाराज राठोड

देहू-आळंदी आणि परिसर म्हणजे संतांची पवित्र भूमी आहे. अशा पवित्र तीर्थक्षेत्री भोगवाद आणि अश्‍लीलतेला प्रोत्साहन देणारा आणि तरुणांना बिघडवणारा असा कार्यक्रम आम्ही होऊच देणार नाही. फेस्टिव्हलला वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध राहील.

करबुडव्या कार्यक्रमाला परवानगी देणे गैर ! – चंद्रकांत वारघडे

सनबर्नच्या आयोजकांवर अवैधरित्या कार्यक्रम घेतल्यामुळे अनेक गुन्हे प्रविष्ट आहेत. मागील वर्षी केसनंद येथे झालेल्या फेस्टिव्हलला आयोजनाच्या अनुमतीसाठी १२ अनुमती अपेक्षित असतांना आयोजकांनी केवळ ७ अनुमती घेतल्या. जिल्हाधिकार्‍यांनीही त्याला अनुमती दिली. त्यांना करमणूक कर शाखेकडून ५० लक्ष रुपये आणि अवैध उत्खनन केल्यामुळे ४० लक्ष रुपये दंड ठोठावण्यात आला. तरीही हा फेस्टिव्हल पुन्हा मोशी गावात घेतला जात आहे. याविरुद्ध आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहोत.

महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला अनुसरूनच कार्य करावे ! – प्रवीण नाईक

पंतप्रधान मोदी नेहमीच ‘मन की बात’ आणि इतर माध्यमातून भारतातील तरुणांना प्रोत्साहन देत असतात. देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्याचे आणि राष्ट्र घडवण्याचे आवाहन करतात; पण ‘सनबर्न’च्या व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देऊन महाराष्ट्र शासन तरुण पिढीला कोणत्या प्रगतीपथावर नेत आहे ? महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला अनुसरूनच कार्य करावे, अशी आमची अपेक्षा आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी १५ व्या वर्षी ज्ञानेश्‍वरी ग्रंथ लिहिला. आज ७०० वर्षांनंतरही त्यांच्याच पुण्यभूमी आळंदीमध्ये ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून तरुण पिढीवर चांगले संस्कार घडत आहेत. या सनबर्नमुळे मात्र अवघ्या १५ वर्षांची कोवळी मुले-मुली दारू पितांना दिसणार असतील, अमली पदार्थांच्या सेवनाला बळी पडणार असतील, तर हा संत ज्ञानदेवांचा अपमान आहे. पुण्यभूमी, संतांची भूमी असलेला भारत या सनबर्नमुळे पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या विळख्यात जाऊ देणार नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *