यांगून (म्यानमार) : म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना या देशातील बौद्ध संस्कृतीची पाळेमुळे उखडून इस्लामी राज्य स्थापन करायचे होते. त्याचा विरोध करण्यासाठी आणि बौद्धांचे संरक्षण करण्यासाठी बौद्धांनी प्रतिकार केला आणि त्यात काही ठिकाणी हिंसाचार झाला, ते क्षम्य आहे’ अशा शब्दांत म्यानमारमधील ज्येष्ठ बौद्ध भिख्खू अशीन वीराथू यांनी म्यानमारमध्ये सध्या चालू असलेल्या घडामोडींचे समर्थन केले. वीराथू यांच्यावर म्यानमारमधील हिंसाचाराला उत्तेजन दिल्याचा आरोप जगभरातील प्रसारमाध्यमे करत आहेत. त्यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला त्यांच्या मंडाले येथील मा सो येन या मठात दिलेल्या मुलाखतीत त्यांची मते व्यक्त केली.
बौद्ध भिख्खू अशीन वीराथू यांनी मांडलेली मते
१. बुद्ध धर्म हा शांतीचा धर्म आहे. सर्व जगात शांती नांदली पाहिजे, हे आमचे उद्दिष्ट आहे.
२. आम्ही स्थापन केलेली ‘९६९’ ही चळवळ बौद्ध संस्कृतीचे विदेशी शक्तींकडून संरक्षण व्हावे यासाठी कार्यरत आहे. तिचा हिंसाचाराशी संबंध नाही.
३. मंडाले येथील २ सहस्र ५०० भिख्खू असलेल्या मठाच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख या नात्याने मी केवळ सत्यच बोलतो. मी हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही. मात्र सर्वच अनुयायी माझे ऐकत नाहीत.
४. म्यानमारमध्ये केवळ ४ टक्के मुसलमान असले, तरी त्यातील अनेकांनी बौद्ध महिलांशी विवाह केला, त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास बाध्य केले आहे. हा सगळा एका मोठ्या कटाचा भाग आहे.
५. मुसलमान खूप गुप्तता बाळगतात. त्यांच्या मशिदीमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नसतो. देशात अल् कायदा आणि इसिस सारख्या आतंकवादी संघटनांचा प्रभाव वाढत आहे. त्यात स्थानिक मुसलमान मोठ्या प्रमाणात भरती होत आहेत. त्यांची कुटुंबेही मोठी असतात. हे सर्व बौद्ध संस्कृतीची शुद्धता न्यून करण्यासाठी करण्यात येत आहे.
६. आम्हाला संयुक्त राष्ट्राचाही विरोध होत आहे. हा ‘राष्ट्रसंघ’ नसून ‘मुसलमान राष्ट्रसंघ’ बनला आहे. त्यावर मुसलमानांचे वर्चस्व आहे. तसेच जगातील प्रसारमाध्यमेही मुसलमानांच्या ताटाखालील मांजरे बनली आहेत.
७. माझ्या मताशी म्यानमारमधील इतर बौद्ध भिख्खूही सहमत आहेत. काही भिख्खूंनी ‘बोडू बळ सेना’ स्थापन केली आहे. त्यांच्याशी आमचा संपर्क आहे.
भिख्खू अशीन वीराथू यांना त्यांच्या कथित भडक भाषणांमुळे वर्ष २००३ ते २०१० असा कारावास भोगावा लागला होता. त्यांना राजकीय आणि सैनिकी समर्थन आहे, असे म्हटले जाते; मात्र अशीन वीराथू यांनी त्याचे खंडन केले आहे. त्यांच्या मते हा बौद्ध नैतिकता आणि इस्लामी आक्रमणकर्ते यांच्यातील संघर्ष आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात