कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्यांच्या विरोधात मावळ्यांचे संघटन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यासाठी त्यांना आई तुळजाभवानीची कृपा आणि समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्यासारख्या संतांचे आशीर्वाद लाभले. त्याचप्रमाणे सध्या असलेली राष्ट्र आणि धर्म यांची दु:स्थिती पालटण्यासाठी येणार्या काळात क्षात्रतेजाला ब्राह्मतेजाची जोड दिली, तर आपण लवकरच हिंदु राष्ट्राची भगवी पहाट पाहू शकू. यासाठी त्यांनी सर्वांना कुलदेवतेची उपासना करायला हवी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित धारकर्यांना केले. कबनूर (इचलकरंजी) येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजनाप्रसंगी ते बोलत होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि कबनूरमधील सर्व शिवप्रेमी यांचेसह ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ या वेळी उपस्थित होते.
या दुर्गा दौडीचा आरंभ हनुमान मंदिर, झेंडा चौक येथे श्री. रवींद्र पाटील, श्री. अभिजीत कोल्हे आणि श्री. सागर परिट यांचे हस्ते ध्वजाचे पूजन करून करण्यात आला. या वेळी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. झेंडा चौकातून निघालेल्या दौडीची अखेर लिगाडे भवन येथे श्री. दुसे यांसह श्री. प्रीतम पवार, तसेच शिवप्रतिष्ठानचे श्री. अनिल साळुंखे, श्री. विवेक स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी ध्येयमंत्र घेऊन ध्वज उतरवण्यात आला.
क्षणचित्रे
१. दुर्गा दौडच्या संपूर्ण मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच अनेक ठिकाणी फुलांचे गालीचे सिद्ध करण्यात आले होते.
२. दौड ज्या मार्गावरून जात होती, त्या मार्गावर येणार्या सर्व नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी श्री दुर्गादेवी आणि छत्रपति शिवाजी महाराज यांची सामूहिक आरती करण्यात येत होती.
३. दौडच्या वाटेवर जागोजागी सुवासिनी महिला ध्वज धारण केलेल्या धारकर्यांच्या पायांवर पाणी घालून ध्वजाचे पूजन करत होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात