पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्यांची नियुक्ती करण्याची मागणी
वारकर्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागणे, हे शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्यांची नियुुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन देऊनही शासनाने त्यावर कृती केली नाही. त्यामुळे १० ऑक्टोबर या दिवशी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. राजाभाऊ महाराज चोपदार यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, वारकरी युवा मंचचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांच्यासह विविध वारकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
१० ऑक्टोबरच्या मोर्च्यात राज्यातील कानाकोपर्यातून लक्षावधी वारकरी सरकारच्या विरोधात सहभागी होणार आहेत, तसेच संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली भजनी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
ह.भ.प. राजाभाऊ महाराज चोपदार पुढे म्हणाले,
१. पंढरपूरच्या देवस्थान समितीवर राज्य सरकारने भाजपचे नेते अतुल भोसले यांची नियुक्ती केली आहे. अतुल भोसले यांनी समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ‘मी पहिल्यांदा पंढरपूरला येत आहे’, असे सांगितले होते. अशी व्यक्ती वारकर्यांचे प्रश्न कसे काय समजून घेऊ शकेल ?
२. ही माहिती आम्हाला वारीच्या वेळी कळली, तेव्हा आम्ही आंदोलन केले होते. तेव्हा आम्हाला ‘वारकर्यांच्या प्रतिनिधींना समितीमध्ये घेतले जाईल’, असे सांगितले होते; मात्र अद्याप सरकारने कोणतेही पाऊल उचलेले नाही.
३. पंढरपूरला भाविक मोठ्या श्रद्धेने प्रती मासाच्या वारीसह आषाढी-कार्तिकीला मोठ्या प्रमाणात येत असतात. वारकर्यांच्या प्रथा-परंपरा यांचा विचार वारकर्यांनाच कळू शकतो. त्यामुळे पंढरपूर देवस्थान समितीवर केलेली राजकीय नियुक्ती रहित करून वारकर्यांची समिती स्थापन करावी.
या मोर्च्याला माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील, मुंबई सेवा दलाचे अध्यक्ष शरद कदम, व्यसनमुक्ती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुंबई डबेवाला मंडळाचे सचिव सुभाष तळेकर, रेल्वे प्रवासी भजन महासंघाचे अध्यक्ष हनुमंत महाराज तावरे, मराठी पत्रलेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, शिक्षक भारती, सानेगुरुजी स्मारक समिती यांनी पाठिंबा घोषित केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात