कळंबोली (पनवेल) : रा.स्व. संघाच्या वतीने दसर्याच्या निमित्ताने येथे पथसंचलन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालयात शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला १५० हून अधिक संघाचे स्वयंसेवक आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ प्रेरणागीताने झाला. त्यानंतर शस्त्रपूजन करण्यात आले.
विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गायकवाड या वेळी म्हणाले की, १९२५ ला आजच्या दिवशी संघाची स्थापना झाली आणि कोणत्याही राजकीय साहायतेच्या शिवाय गेली ९२ वर्षे अविरतपणे हिंदुत्वाचे कार्य संघ करत आहे. सात्त्विक आणि बलशाली समाजाचे निर्माण करणे, हा संघाचा उद्देश आहे. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे या वेळी म्हणाले की, हिंदूंच्या देवतांनी दाही दिशांना हरवले तो दिवस म्हणजे विजयादशमी. आता फक्त दुर्गादेवीचा पराक्रम आणि प्रभु श्रीरामाचा रावणवध यांचे स्मरण करून नव्हे, तर स्वपराक्रमाने शौर्याचा इतिहास निर्माण करण्याची वेळ आली आहे. आपल्या देवतांच्या हातात शस्त्र आहेत. अवतारांनी असुरांचा नाश केला. समर्थ रामदासस्वामींसारख्या अनेक संतांनी आपल्याला शौर्य दाखवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. रामायण आणि महाभारत या धर्मग्रंथांतही शौर्याचा इतिहास आहे. आज हिंदूंसमोर आतंकवाद, नक्षलवाद अशा अनेक समस्या आहेत. या सर्वांचा सामना करण्यासाठी हिंदूंना आपले शौर्य दाखवून आपण सिंह आहोत, हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात