हिंदु परंपरा आणि संस्कृती यांच्यावर आधारित आदर्श हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
इंग्रजांनी भारतावर लादलेली लोकशाही अपयशी !
रामनाथी (गोवा) : स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी जी व्यवस्था लोकशाहीच्या नावावर लादली, ती भारतातील परंपरा आणि नागरिक यांना विचारात न घेता लादली गेली. असे का झाले, या कारणांचा अभ्यास अल्प प्रमाणात केला जातो. सध्याच्या लोकशाहीत भारतातील लोकशाहीची व्यवस्था सर्वाधिक चांगली आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी दीर्घकालीन षड्यंत्राद्वारे प्रचारतंत्र वापरून नागरिकांच्या मनावर हे बिंबवले गेले. ही व्यवस्था खरोखरच चांगली आहे, तर अजूनही सामान्यांना त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलने का करावी लागतात, याचा विचार झाला पाहिजे. बहुसंख्यांकांना डावलून अल्पसंख्यांकांचा विचार करणारे नव्हे, तर समाजाचा सर्वांगीण विकास करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासारखे हिंदु राष्ट्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.
येथील सनातनच्या आश्रमात ७ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथम पत्रकार-संपादक अधिवेशनाला आरंभ झाला. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. ९ ऑक्टोबरपर्यंत चालणार्या या अधिवेशनात विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र यांचे संपादक अन् पत्रकार सहभागी झाले आहेत. उद्घाटनाच्या वेळी नंदूरबार येथील दैनिक तापीकाठचे संपादक श्री. चंद्रशेखर बेहरे, पुणे येथील हिंदुबोध मासिकाचे संपादक श्री. विवेक सिन्नरकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी दीपप्रज्वलन केले. सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी केलेल्या शंखनादाने अधिवेशनाला प्रारंभ झाला.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,
१. सध्याची लोकशाही अल्पसंख्य-बहुसंख्य हा अयोग्य विचार करायला शिकवते. त्यामुळे एखादी व्यक्ती समाजाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्या मताचे मूल्य केवळ एकच असल्याने योग्य असूनही तिला आणि तिच्या मताला नाकारले जाते अन् त्याच निकषांमुळे बहुसंख्य हिंदूंनाही डावलले जाते. यातच लोकशाहीचा फोलपणा दिसून येतो.
२. सध्याच्या व्यवस्थेत प्रत्येक स्तरावर हिंदु धर्माला विरोध करणार्यांना नेमले गेले. त्यांनी प्राचीन भारतीय कला, विद्या, परंपरा यांना समाजापासून एवढे दूर केले की, हिंदु असणे हे काहींना अपराधीपणाचे वाटू लागले.
३. कर्नाटकमधील जनतेला उत्तर भारतियांची भाषा म्हणून हिंदी भाषा नको असते; मात्र परकीय असूनही इंग्रजी भाषेला पाठिंबा दिला जातो. व्यवस्थेद्वारे देशाला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. या शक्तींवर कोणतीही कारवाई होत नाही, हेच लोकशाहीचे मोठे अपयश आहे.
४. आधुनिक हिंदूविरोधी प्रचारतंत्राद्वारे नष्ट होत असलेली हिंदु संस्कृती पुनरुज्जीवित होण्यासाठी हिंदु राष्ट्राचा विचार याच प्रचारतंत्राद्वारे प्रवाहित करणे आवश्यक आहे.
हिंदु राष्ट्रासाठी हिंदु विचारवंतांची शृंखला निर्माण होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस म्हणाले, समाजाला जागृत करणारी विचारशक्ती म्हणजे पत्रकार आणि संपादक ! विचारांची शक्ती कुठल्याही शस्त्रापेक्षा अधिक असते. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या मुखपत्रांतून वैचारिक क्रांतीचे विचार मांडले म्हणून ते असंतोषाचे जनक ठरले. सध्याच्या परिस्थितीत आदर्श राष्ट्ररचनेचे उद्दिष्ट ठेवणे हे मोठे आव्हान आहे. अशा वेळी हिंदुत्वाची विचारधाराच समाजाला योग्य दिशा देणारी एकमेव प्रबळ विचारधारा आहे. या विचारधारेतून हिंदु राष्ट्रासाठी हिंदु विचारवंतांची शृंखला निर्माण होणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात