हिंदुद्वेषी काँग्रेसी नेते आणि त्यांची बटीक बनलेली पोलीस यंत्रणा यांचा बुरखा फाडणारी श्री. सुधाकर चतुर्वेदी यांची मुलाखत
निरपराध श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना केवळ जामीन देण्यावर न थांबता त्यांना आणि अन्य आरोपींना यातून निर्दोेष म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे ! ज्या अन्वेषण अधिकार्यांनी खोट्या आरोपांखाली श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले आणि त्यांच्या आयुष्यातील ही वर्षे वाया घालवली, त्या अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि या अधिकार्यांकडून श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना हानीभरपाई दिली गेली पाहिजे, अशी सर्वत्रच्या हिंदूंची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
गेल्या दशकभरापासून काँग्रेसी नेत्यांकडून भारतातील हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना यांना आतंकवादी ठरवून त्यांचे दमन केले जात आहे. निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना कुठल्यातरी खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांना कारागृहात डांबले जाते. तेथे त्यांचा अमानवी छळ केला जातो. इतकेच नव्हे, तर अटकेतील हिंदुत्वनिष्ठांच्या कुटुंबियांचेही प्रचंड मानसिक खच्चीकरण केले जाते. वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेषत्वाने हा कटू अनुभव आला. या प्रकरणात तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी ‘भगवा आतंकवादा’चा बागूलबुवा उभा करून हिंदूंना लक्ष्य केले. मूळात ‘मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हे हिंदूंच्या विरोधात रचले गेलेले एक मोठे षड्यंत्र होते’, असे हिंदुत्वनिष्ठ संघटना सांगत होत्या; पण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणातील संशयितांना एका मागोमाग एक जामीन मिळू लागल्यावर आता ही गोष्ट उघड होऊ लागली आहे. या प्रकरणात तब्बल ९ वर्षांनंतर जामीन मिळालेले हिंदुत्ननिष्ठ श्री. सुधाकर चतुर्वेदी यांची तत्कालीन हिंदुद्वेषी काँग्रेसी आणि त्यांची बटीक बनलेले काही पोलीस यांचा बुरखा फाडणारी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत येथे क्रमश: प्रसिद्ध करत आहोत. यावरून हिंदुबहुल राष्ट्रात हिंदूंना कशाप्रकारे पद्धतशीरपणे संपवण्याचा प्रयत्न केला जातो, हे हिंदूंनी जाणावे आणि या अन्यायाच्या विरोधात संघटित होऊन वैध मार्गाने लढा द्यावा, ही अपेक्षा. (भाग १)
१. श्री. चतुर्वेदी यांची साधारण कौटुंबिक पार्श्वभूमी !
प्रश्न : तुम्ही मूळचे कुठले रहाणारे ? तसेच तुमच्या कुटुंबियांविषयी आम्हाला सांगा.
श्री. सुधाकर चतुर्वेदी : मी मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील मिर्झापूर जिल्ह्यातील आहे. कुटुंबात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि भाऊ आहेत. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून लहानपणापासूनच मला समाजकार्याची आवड होती. वर्ष १९९२ पासून समाजकार्यासाठी मी घराच्या बाहेरच आहे. वडील आणि आजोबा यांच्यामुळे घरात धार्मिक वातावरण आहे. वर्ष १९८४ – १९८५ मध्ये मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलो गेलो. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मला अटक होईपर्यंत मी संघाचे काम करत होतो.
२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षे कार्यरत !
प्रश्न : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तुमचे कार्य कसे होते ? तेथे तुम्हाला कुठले पद होते का ?
श्री. सुधाकर चतुर्वेदी : आमच्या गावात संघाची शाखा भरते. शाखेच्या जिल्हा, प्रांत यांच्या कार्यकारिणीप्रमाणे मी शाखा स्तरावर, तसेच नगर स्तरावर काम केले आहे. मी महाराष्ट्रात वर्ष १९९३ मध्ये आलो. महाराष्ट्रात वर्ष १९९५ पासून मी संघाचे काम करण्यास आरंभ केला. आमचे अधिक कार्य पुण्यात असे. पुण्यात मी संघाचा नगर कार्यवाह, शारीरिक प्रमुख आदी पदांवर काम केले आहे. काही दिवस बजरंग दलाचेही काम केले आहे. वर्ष २००१ मध्ये मी नाशिकला गेलो. तेथे वर्ष २००८ पर्यंत प्रचारक म्हणून काम केले.
३. पोलिसांनी प्रथम फसवून कह्यात घेणे आणि नंतर अनेक दिवस प्रचंड यातना देऊन मारहाण करणे !
प्रश्न : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तुम्हाला कधी आणि कशी अटक झाली ?
श्री. चतुर्वेदी : मला बंदी केव्हा बनवले ? कसे बनवले ? हे तर माहीत आहे; पण का बनवले, हे आजपर्यंत माहीत नाही. २२ ऑक्टोबर २००८ ला मी कामानिमित्त मध्यप्रदेश येथे गेलो होतो. तेथून परत आल्यानंतर नाशिक, देवळाली येथे मी माझ्या घरी गेलोे. दुसर्या दिवशी सकाळी १० वाजता मला नाशिकच्या आतंकवादविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बागडे यांचा फोन आला. त्यांनी मला कार्यालयात बोलवले. २४ ऑक्टोबरला मी दिवाळीसाठी पुन्हा गावी जाणार होतो. कुटुंबीय दुसर्या गावी गेले होते. तेथून त्यांना घेऊन परत गावाकडच्या घरी जायचे होते. माझे २४ ऑक्टोबर या दिवशीचे जाण्याचे आरक्षण होते. म्हणजे मी २३ ऑक्टोबरला एक दिवस थांबून २४ ऑक्टोबरला परत जाणार होतो. २३ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता मला बागडे यांचा पुन्हा फोन आला. त्यांनी मला ‘तुम्ही कुठे आहात ?’, असे विचारले. मी म्हटले ‘देवळाली कॅम्पमध्ये आहे.’ त्यावर ते म्हणाले, ‘मीही तेथेच आहे.’ ते जेथे होते तेथे त्यांनी मला बोलवून घेतले. त्यांच्या समवेत ४ – ५ जण होते. त्यांनी मला ओढून त्यांच्या गाडीमध्ये बसवले. त्यानंतर त्यांनी मला नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यात नेले. तेथे मला मारहाण, तसेच शिवीगाळ केली. मला काही कार्यकर्त्यांची नावे विचारली. ती मी सांगितली. तोपर्यंत ‘त्यांनी मला का पकडले आहे’, हे मलाच माहीत नव्हते, तसेच त्यांनीही स्वत:हून काहीही सांगितले नव्हते. तेथे माझा जबाब लिहून घेण्यात आला. रात्री१२ वाजल्यानंतर मला मुंबई येथे आणण्यात आले. माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि मला मुंबईत काळाचौकी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. माझा भ्रमणभाष, ‘एटीएम् कार्ड’, वाहन परवाना, घराची चावी, गाडीची चावी सर्व जप्त केले होते. माझ्या भ्रमणभाषमधील सर्व क्रमांक लिहून घेतले. भ्रमणभाषमधील एखाद्या निनावी क्रमांकाचे नाव ते मला विचारत. ते नाव मला सांगता न आल्यास ते ‘खोटे सांगतो’ असे ओरडून पुन्हा मला मारत. असे दुसर्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत चालू होते. सकाळी १० वाजता मला तेथील प्रमुख परमवीर सिंह यांच्यासमोर उभे केले गेले. तेथे जाऊन डोळ्यांवरील पट्टी सोडली आणि विचारले की, ‘खरं खरं सांग, कुठे कुठे स्फोट केले ?’, ‘कोण कोण समवेत होते.’ यावर मी विचारले, ‘कोणते स्फोट ?’ असे म्हटल्यानंतर त्यांनी ‘याला गरम करा’ असे म्हटले. ही पोलिसांची भाषा आहे. असा आदेश मिळाल्यावर संबंधिताला तेथेच आडवे पाडले जाते. जांघेवर एक मोठी काठी ठेवतात. त्यावर दोन्ही बाजूंना ४ – ४ जण उभे रहातात. दोन्ही अंगठे आणि पाय बांधून ठेवतात अन् पायांवर मारतात. जोपर्यंत व्यक्ती काही सांगत नाही, तोपर्यंत ते तिला मारत रहातात. असे मला मारता मारता एकदा मी बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आल्यावर मला पुन्हा उभे करण्यात आले आणि ‘आता खरे खरे सांगून टाक तुझ्यासमवेत कोण कोण होते ?’, असे विचारले. तोपर्यंत ‘ते कोणत्या स्फोटाविषयी विचारत आहेत’, हे मला माहीत नव्हते, तसेच त्यांनीही काहीच सांगितले नव्हते. ते मला दुपारी १२ वाजेपर्यंत मारत होते. मारून झाल्यानंतर ते मला पळायला सांगत. मग पाय जरा मोकळे झाले, की पुन्हा मारत. तरीही त्यांना काहीही न मिळाल्याने पोलीस म्हणाले, ‘‘हा असे ऐकणार नाही.’’ मग मला त्यांच्या ‘टॉर्चर रूम’मध्ये नेले. तेथे ए.सी. चालू असतो, तसेच बर्फ ठेवलेले असतात. त्या खोलीत मला माझे सर्व कपडे उतरवून उभे केले. तेथे ४ जण उभे होते. त्यांनी मला विचारले ‘आता सांग खरे.’ त्यांनी मला पुन्हा मारहाण केली. ‘मला काहीच माहीत नव्हते, तर मी काय सांगू ?’, असा प्रश्न माझ्यासमोर होता. ते मला म्हणाले, ‘तुला मालेगाव बॉम्बस्फोट माहीत नाही ?’ तेव्हा मला कळाले की, ते मालेगाव बॉम्बस्फोटाविषयी विचारत आहेत. तोपर्यंत स्फोट कधी झाला, हेही मला माहीत नव्हते. स्फोट झाला त्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर २००८ या दिवशी मी गावाला होतो. वृत्तपत्रात त्याविषयीचे वृत्त वाचले होते. पोलिसांनी विचारले, ‘‘तुला मालेगाव स्फोट माहीत नाही ?’’ मी ‘माहीत नाही’, असे उत्तर दिले. तोपर्यंत मी एवढा मार खाल्ला होता की, मी काय बोलत आहे, ते मलाच काही कळत नव्हते. मी २ दिवसांपासून उपाशी होतो. त्यांनी मला खाणे, पिणे, झोपणे आदी काहीच करू दिले नव्हते. मला मारून मारून तेच थकले होते. कुणाला कधी आणि कुठे पकडायचे, याचे त्यांचे पहिल्यापासूनच नियोजन होते. माझ्यासमोर ध्वनीमुद्रण संच (रेकॉर्डर) घेऊन ते विचारत ‘कोण कोण होते सांग ? संघाचे कुणी होते का ?’ ते स्वत:च काहींची नावे घेऊन ‘हे होते का ? ते होते का ?’, असे विचारत. त्यावर मी ‘नाही’, असे उत्तर दिले. समजा त्यातील कुणी असते, तर बोललो असतो ना. काहीतरी सांगायचेच म्हटले, तर मला काहीतरी खोटी कथा रचून सांगावे लागले असते.
४. कुठलाही ‘वॉरंट’ न देता कह्यात घेतले !
प्रश्न : कह्यात घेण्यापूर्वी तुम्हाला ‘वॉरंट’ वगैरे दिले का ?
श्री. चतुर्वेदी : मला कह्यात घेण्यापूर्वी पोलिसांकडून मला कोणतेच ‘वॉरंट’ देण्यात आले नाही. ते मला फसवून घेऊन गेले. आमच्या २ – ३ दिवस आधी साध्वीजींना (साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना) तेथे आणण्यात आले होते. ते साध्वीजींना मारून झाल्यावर मग आम्हाला मारण्यासाठी येत. साध्वीजींचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज मला खोलीत ऐकू येत असे. तेथे अरुण खानविलकर नावाचा पोलीस अधिकारी होता. आता ते २ वेळा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पकडले गेले आहेत. ते पॅन्ट आणि बनियान एवढेच परिधान करत असत. वर्दीही घालत नव्हते. पोलिसांना कोणताच धागा मिळत नव्हता, तर त्यांनी आम्हाला सोडून द्यायला हवे होते. त्यांनी इतर सर्वांना अटक केली; पण मला अटक केली नाही. मला ९ दिवस तेथेच ठेवले आणि चौकशी करत होते.
५. श्री. समीर कुलकर्णी यांना अटक करण्यासाठी श्री. चतुर्वेदी यांना विमानाने भोपाळला नेले !
श्री. सुधाकर चतुर्वेदी : २३ ऑक्टोबर या दिवशी मला मारहाण करण्यात आली आणि २४ ऑक्टोबरला श्री. समीर कुलकर्णी यांना कह्यात घेण्यासाठी मला मुंबईहून भोपाळला ‘इंडिया बूल्स’च्या विमानाने नेण्यात आले. भोपाळला हॉटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था केली होती. मला ज्या विमानाने नेण्यात आले ते विमान भोपाळमधील राजा भोज विमानतळावर रात्रभर ठेवले होते. दुसर्या दिवशी तेच विमान मला मुंबईला घेऊन आले. तेव्हा मला प्रश्न पडला की, ‘आतंकवादविरोधी पथकाला हे विमान कुणी दिले ? त्याचा खर्च सरकारने केला कि आतंकवादविरोधी पथकाने केला ? एवढे मोठे नियोजन कुणी केले ?’ या सर्वांविषयी मी माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागितली. ‘ते कोणत्या आस्थापनाचे विमान होते ? किती प्रवास केला ? प्रवाशांची नावे काय होती ? पैसे कुणी दिले ? पैसे धनादेशाद्वारे (चेक) दिले कि अन्य पद्धतीने दिले ? या सर्वांसाठी तत्कालीन सरकारचा आदेश होता का ? या सर्व गोष्टींची सर्व माहिती माझ्याकडे आहे.
६. श्री. चतुर्वेदी यांना वेगळ्याच; पण खोट्या गुन्ह्याखाली अटक करणारे पोलीस !
श्री. सुधाकर चतुर्वेदी : ४ नोव्हेंबरला सायंकाळी खानविलकर आणि विजय कदम हे पोलीस अधिकारी मला म्हणाले, ‘‘यात तुझा दोष काही नाही. आम्ही तुझ्यावर एक छोटासा गुन्हा नोंद करून जामीनही मिळवून देऊ. तू अधिवक्ता नेमू नकोस.’’ पोपट आव्हाड यांनी मला गाडीत बसवले आणि माटुंगा पोलीस ठाण्यात नेले. तेथे माझ्यावर सैन्याचा खोटा पास आणि ‘रिव्हॉल्वर’ बाळगल्याविषयी गुन्हा नोंद केला अन् मला पोलीस ठाण्यात पाठवले. तोपर्यंत मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केली नव्हती. १५ नोव्हेंबरपर्यंत मला पोलीस ठाण्यात ठेवले. कुर्ला न्यायालयाच्या न्यायधिशांनी मला ‘अधिवक्ता आहे का ?’, असे विचारल्यानंतर मी त्यांना ‘नाही’, असे उत्तर दिले. त्या वेळी आतंकवादविरोधी पथकाने माझ्यासाठी अधिवक्ता आणला होता, तसेच काळाचौकी पोलीस ठाण्यातील सर्वजण तेथे उपस्थित होते. त्या सर्वांची नावे माझ्याजवळ आहेत. त्यांनी वकीलनाम्यावर माझी स्वाक्षरी घेतली आणि त्याचे देयक (बील) बनवले. मला जामीन देणारी व्यक्ती बनावट होती. मी तिला ओळखतही नाही. ती व्यक्ती कोणीतरी उत्तर प्रदेशमधील होती आणि त्या वेळी ती बहुधा कल्याण येथे रहात होती. (क्रमश: वाचा पुढील रविवारी)
वाचकांना विनंती !
भारतातील पोलीस लाखो निरपराध्यांना छळतात ! अशांची नावे सनातन प्रभातला कळवा !
‘पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेले ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या ‘महाराष्ट्रातील गुन्हे २०१०’ या अहवालातून उघड झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, भारतातील पोलिसांनी अशा लाखो निरपराध्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केलेला असतो. निष्पाप असूनही पोलिसांचा छळ अनुभवणार्यांनी त्यांचे अनुभव (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) सनातन प्रभातच्या कार्यालयात पाठवावेत.
पत्ता : ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा – ४०३ ४०१,
फॅक्स : ०८३२ – २३१८१०८ किंवा
इ-मेल : [email protected]
– संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात