Menu Close

ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात सनातन प्रभात नियतकालिकांच्या वाचकांचा मेळावा

वाचक मेळाव्यामध्ये गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व, क्षात्रधर्म साधना म्हणजे काय, राष्ट्र आणि धर्म यांची होणारी विटंबना याला क्षात्रवृत्तीने आणि सनदशीर मार्गाने आपण कसे रोखू शकतो, तसेच साधनेचे मूलभूत टप्पे नाम, सत्संग, सत्सेवा आणि त्याग यांचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच ‘वाचकांचा धर्मकार्यातील सहभाग’ या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. त्या वेळी अनेक वाचकांनी त्यात यशाशक्ती सहभागी होऊ, असे आश्‍वासन दिले. सनातन प्रभातच्या वाचकांना या मेळाव्यामुळे सनातन प्रभातचे राष्ट्र आणि धर्म कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानही लक्षात आले.

सनातन प्रभातच्या वाचक मेळाव्यात वाचकांचा उर्त्स्फूत सहभाग आणि कृतीशील होण्याचे आश्‍वासन !

मार्गदर्शन करतांना सौ. वेदिका पालन, बाजूला श्री. अजय संभूस

ठाणे / नागपूर : डोंबिवली (जिल्हा ठाणे) पश्‍चिम येथील निशिकांता वसाहतीमध्ये, ठाण्यातील कोलशेत येथील डोंगरीपाडा भागात, तसेच नागपूर येथे सनातन प्रभातच्या वाचकांचा मेळावा पार पडला.

डोेंबिवली : येथे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी मार्गदर्शन केले. समितीचे श्री. अजय संभूस यांनी वाचक मेळाव्याचा उद्देश सांगितला. राष्ट्र आणि धर्म जागृती अन् हिंदु राष्ट्र स्थापना या कार्यात दैनिक सनातन प्रभातचे महत्त्व अन् वाचकांचे योगदान याविषयीही या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. भाजपा युवा अध्यक्ष डोंबिवली पश्‍चिम मंडळाचे श्री. पवन पाटील यांनी वाचक मेळाव्यासाठी विनामूल्य साहित्य उपलब्ध करून देऊन पाठिंबा दर्शवला.

ठाणे : येथे सौ. दीक्षा पेंडभाजे आणि सौ. धनश्री केळशीकर यांनी वाचकांना मार्गदर्शन केले.

ठाणे जिल्ह्यातील वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

१. श्री. सदानंद चव्हाण यांनी जमेल ती सेवा करण्यास सिद्धता दर्शवली.

२. फोर्टीस रुग्णालयात रक्तपेढीतज्ञ असणारे श्री. मनीष यादव यांनी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण देऊ शकतो’, असे सांगितले.

३. श्री. प्रशांत सरवटे हे पौरोहित्य करतात. ते म्हणाले, ‘‘मी जेथे पौरोहित्य करण्यास जाईन तेथे साधनेचे महत्त्व सांगेन !’’ (असे पुरोहित हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. या वेळी काही तरुणांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

वैशिष्ट्यपूर्ण !

वाचक श्री. सोमेश गायकवाड यांना प्रार्थना करतांना श्रीकृष्णाचे दर्शन झाल्याची अनुभूती आली.

अध्यात्मप्रसाराची सेवा करण्यासाठी येऊ ! – वाचकांचा कृतीशील प्रतिसाद

शंका निरसन करतांना श्री. श्रीकांत क्षिरसागर व श्री. अतुल आर्वेन्ला

नागपूर : आजच्या वाचक मेळाव्यात सर्व वाचकांचे एकत्रीकरण झाले. यामुळे पुष्कळ चांगले वाटले. सनातन प्रभातचे हिंदु राष्ट्र निर्मितीचे ध्येय, साधना आणि सेवा यांचे महत्त्व समजल्याने अध्यात्मप्रसाराची सेवा करण्यासाठी येऊ, असे ६ ऑक्टोबरला येथे पार पडलेल्या मेळाव्यात वाचकांनी उत्स्फूर्तपणे सांगितले.

या वेळी वाचकांना सनातन प्रभात संदर्भात असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती सुषमा बत्रा यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात ६२ वाचक उपस्थित होते. सोबतच लावलेले सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन, तसेच धर्मशिक्षण फलकांची प्रदर्शनी यांचाही सर्व वाचकांनी लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *