-
कुंभकोणमच्या प्रमुख मंदिरांत झालेल्या ध्वजाराहेण विधीने महोत्सवाला झाला आरंभ
-
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी जयेंद्र सरस्वतीजी यांची वंदनीय उपस्थिती
-
मेळ्याला ३६ लाख हिंदू येण्याची शक्यता
तांजावुर (तमिळनाडू) : १३ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण भारताचा कुंभमेळा समजला जाणार्या महामहम महोत्सवाचा शुभारंभ झाला. तांजावुर जिल्ह्यातील कुंभकोणमच्या आदिकुंबेश्वरर, नागेश्वरर, काशी विश्वनाथर, आबिमुगेश्वरर, कलाहस्तिश्वरर आणि सोमेश्वर मंदिरांत ध्वजारोहण विधी करून महोत्सवाचा आरंभ झाला. या वेळी कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी जयेंद्र सरस्वती यांची वंदनीय उपस्थिती होती.
१. विविध मठांचे मठाधिपती आणि साधू-संतांनी कुंभकोणमच्या तलावात स्नान केले.
२. साधू-संतांसह सहस्रो हिंदूंनीही पवित्र तलावात स्नान केले.
३. ध्वजारोहण विधीच्या कार्यक्रमाला स्थानिक जिल्हाधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या पदांवरील प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.
४. २२ फेब्रुवारीपर्यंत चालू असणार्या या मेळ्यात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत स्नान करता येणे शक्य होणार आहे.
५. या मेळ्याला ३६ लक्ष हिंदू भाविक येणार असल्याने प्रशासनाने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
महामहमचा इतिहास
लोक आपली पापे धुण्यासाठी गंगा, यमुना, सरस्वती, शरयु, गोदावरी, महानदी, नर्मदा, कावेरी आणि पायोश्नी या नद्यांमध्ये स्नान करत. त्यामुळे या नद्यांचे पाप वाढले. त्या पापापासून मुक्त होण्यासाठी सर्व नद्या ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाने नद्यांची पापे धुण्यासाठी त्यांना एकत्रितरीत्या कुंभकोणमच्या तलावात स्नान करण्यास सांगितले. तेव्हापासून या महोत्सवाला आरंभ झाला.
काय आहे महामहम महोत्सव ?
महामहम महोत्सव प्रत्येकी १२ वर्षांनी येतो. मागचा महामहम महोत्सव मार्च २००४ मध्ये साजरा करण्यात आला होता.
या महोत्सवाच्या वेळी देशातील सर्व महत्त्वाच्या नद्या कुंभकोणमच्या तलावात एकत्र येतात, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. त्यामुळे या काळात तलावात केलेल्या स्नानाचे फळ सर्व नद्यांमध्ये केलेल्या स्नानाच्या एकत्रित फळाइतके मिळते.
महामहम महोत्सवाचा शेवटचा दिवस सर्वांत विशेष समजला जातो; कारण या दिवशी कुंभकोणममधील सर्व मंदिरांच्या देवतांच्या मूर्तींना तलावात स्नान घालण्यात येते. या दिवशी लाखो हिंदू तलावात स्नान करतात. याला तीर्थावरी असे म्हणतात.
या दिवशी केलेल्या स्नानाने पापांचे हरण होते, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. स्नानानंतर देवतांना अर्पणस्वरूपात धन अथवा भेटवस्तू दिल्या जातात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात