जळगाव येथील धर्मप्रेमींचा हुंकार,‘धर्मजागृती सभा’ यशस्वी करण्याचा निर्धार !
जळगाव : पूर्वी जळगावची ओळख ‘सिमी हब’ म्हणून होत असे; मात्र हिंदूंचा संघटितपणा आणि प्रतिवर्षी होणार्या हिंदु धर्मजागृती सभा यांमुळे आज जळगावची ओळख ‘हिंदुत्वाचा गड’ म्हणून निर्माण झाली आहे. जळगावच्या धर्मप्रेमींमध्ये ‘इतिहास’ निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी शहरातील दापोरेकर मंगल कार्यालयात हिंदुत्वनिष्ठांच्या सभेनिमित्त घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीत केले. या बैठकीला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी ही धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा निर्धार या वेळी केला.
बैठकीचे प्रास्ताविक करतांना हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे म्हणाल्या, ‘‘१९ नोव्हेंबरला होणारी धर्मजागृती सभा ही जळगाव जिल्ह्यातील ६१ वी सभा असणार आहे. या सभेत पुरुषांच्या समवेेत महिलांची उपस्थितीही लक्षणीय असण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.’’ या वेळी विवेकानंद व्यायामशाळेचे व्यवस्थापक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. शेखर कुळकर्णी यांच्या हस्ते संगणकाची कळ दाबून धर्मजागृती सभेच्या ‘बोधचिन्हा’चे अनावरण करण्यात आले.
श्री. प्रशांत जुवेकर पुढे म्हणाले की, ‘‘जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा भगवंत अवतार घेतो आणि धर्माधिष्ठीत राज्याची स्थापना करतोच. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. हा धर्म विरुद्ध अधर्म असा लढा असणार आहे. तिसरे महायुद्ध होणार, हे कोणा ज्योतिषाला सांगण्याची आवश्यकता नाही. देशभरात घेतल्या जाणार्या हिंदु धर्मजागृती सभांमुळे एक प्रकारे वैचारिक मंथनच होत आहे. त्यातून कोण धर्माच्या बाजूने कोण अधर्माच्या बाजूने हे सिद्ध होणारच आहे. त्यासाठी प्रत्येकाने ‘धर्मजागृती सभे’च्या माध्यमातून धर्माचरण करून भगवंताची कृपा संपादन करूया. आपापल्या परीने तन, मन, धन आणि प्राणपणाने सहभागी होऊन धर्मकार्यात झोकून देऊन सेवारत होऊया.’’
सभेचा प्रचार जळगाव, भुसावळ, जामनेर, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा, पाचोरा, यावल, चोपडा या तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये केला जाणार आहे. होर्डींग, भित्तीपत्रके, हस्तपत्रके, सोशल मिडीया, रिक्शेतून उद्घोषणा, व्हाईस कॉल, बैठकांच्या माध्यमांतून गावोगावी पोहोचण्याचा मानस या वेळी धर्मप्रेमींनी केला. या बैठकीला शहरासह ग्रामीण भागातील संघटना, गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संघटना, तरुणांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
या वेळी सनातननिर्मित ‘आकाशकंदील’ आणि वर्ष २०१८ चे सनातन पंचांग वितरीत करण्यात आले. यालाही धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बैठकीला जय मातादी गृप सिंधी कॉलनी, शिवसेना, तसेच बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांसह अयोध्यानगर मित्र मंडळ, ईच्छादेवी मित्र मंडळ, गोरक्षा दल, शिवप्रतिष्ठान, विवेकानंद व्यायाम शाळा यांच्यासह ग्रामीण भागातील मंडळे आणि सामाजिक संघटनां यांचे ८० पदाधिकारी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात